ऑनलाइन लोकमत
न्यू यॉर्क , दि.10 - भारतामध्ये उत्साहात साजऱ्या झालेल्या गुरुपौर्णिमेची दखल नासानेही घेतली आहे. नॅशनल एरोनॉटिक्स अॅंड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासाच्या ट्वीटर हॅंडलवरुन कालच्या पौर्णिमेची माहिती देताना गुरु पौर्णिमेचा उल्लेख करण्यात आला आहे. 9 जुलै रोजी येणाऱ्या पौर्णिमेला जगाच्या विविध भागांमध्ये कोणकोणत्या नावांनी ओळखले जाते याची माहिती देणारा एक ट्वीट नासाने केला आहे. त्यामध्ये गुरु पौर्णिमेचाही समावेश आहे.
नासाच्या विविध विभागांचे विविध ट्वीटर हॅंडलर आहे. त्यामध्ये केवळ चंद्र, चंद्रासंबंधी माहिती देणारे नासा मून हे हॅंडल आहे. काल पौर्णिमेच्या निमित्त माहिती देण्यासाठी केलेल्या ट्वीटमध्ये "फुल मून धिस विकेंड कॉल्ड गुरुपौर्णिमा, हे मून, मिड मून, राइप मून, बक मून ऑर अवर फेवरिट थंडर मून" अशी नावे नमूद करण्यात आली आहेत. जुलै महिन्यामध्ये येणाऱ्या गडगडाटी वादळांमुळे या महिन्यातील पौर्णिमेला थंडर मून असे संबोधले जाते. चंद्राला देण्यात आलेल्या विविध नावांमध्ये बहुतांश नावे अमेरिकेतील जमातींनी ठेवलेली आहेत. त्यामुळे त्याला इतक्या विविध नावांनी ओळखले जाते. नासाने हे ट्वीट केल्यानंतर हजारो लोकांनी त्यास रिट्वीट करुन नासाचे अभिनंदन करून आनंद व्यक्त केला आहे. विशेषतः भारतीय व्यक्तीचा या रिट्विट करणाऱ्या लोकांमध्ये समावेश आहे. गुरुपौर्णिमेचा ट्वीटमध्ये समावेश केल्याबद्दल नासा तुम्हाला धन्यवाद अशा शब्दांमध्ये अनेकांनी रिट्वीट केले आहे. काही लोकांनी भारताचा प्रभाव जगभरात पुन्हा सर्वत्र दिसून आला असेही लिहिले आहे. सुमारे 7 हजारहून अधिक लोकांनी या याला रिट्वीट केले असून 11 हजार लोकांनी ते लाइक केले आहे.
आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला भारतामध्ये गुरुपौर्णिमा म्हटले जाते. या दिवशी आपल्याला घडवणाऱ्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. रविवारी अनेकांनी त्यांच्या गुरूंना भेटून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या, परंतु अनेकांना रेल्वेच्या जम्बो ब्लॉकमुळे किंवा कामामुळे त्यांच्या गुरूंना भेटता आले नाही. अशा लोकांनी सोशल मीडियाच्या मदतीने गुरूंना शुभेच्छा दिल्या व त्यांच्याकडून आशीर्वादही घेतले. फेसबुक ट्वीटर आणि व्हॉट्सअॅपवर गुरुपौर्णिमेचे वातावरण पाहण्यास मिळत होते. सोशल मीडियावर गुरू देवदत्त, स्वामी समर्थ, गुरू द्रोणाचार्य, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई, शिवरायांचे गुरू समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज यांच्या कथा व फोटो फिरत होते.