वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता एक नवी घोषणा केली आहे. उत्तर कोरियाला दहशतवादाचं समर्थन(sponsor of terrorism) करणा-या देशांच्या यादीत पुन्हा एकदा टाकण्यात आलं आहे. 9 वर्षांपूर्वीसुद्धा उत्तर कोरियाचं नाव या यादीत टाकण्यात आलं होतं. त्यानंतर जॉर्ज डब्लू बुश यांच्या शिष्टाईमुळे ते हटवण्यात आलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला दहशतवाद पुरस्कृत देश असल्याचं जाहीर केलं आहे. खरंतर हे आधीच करायला हवं होतं, असंही ट्रम्प म्हणाले आहेत.राष्ट्राध्यक्ष ट्रम्प कॅबिनेट बैठकीत म्हणाले, उत्तर कोरियावर मोठ्या प्रमाणात प्रतिबंध लादण्यात येतील. ट्रम्प यांनी आण्विक कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवाद्यांच्या कारवाईचं समर्थन केल्याप्रकरणी उत्तर कोरियाला दहशतवाद पुरस्कृत देशांच्या यादीत टाकलं आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग ऊन यांनी संयुक्त राष्ट्रानं घातलेलं निर्बंध झुगारून स्वतःचा आण्विक कार्यक्रम आणि अणुचाचणी सुरूच ठेवली आहे.या वर्षी सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं उत्तर कोरियावर निर्बंध लादले होते. उत्तर कोरियाचा निर्बंधाचा प्रस्ताव अमेरिकेनं तयार केला होता आणि त्या प्रस्तावाला चीन व रशियासह 15 सदस्य देशांनी मंजुरी दिली होती. या निर्बंधांच्या माध्यमातून अमेरिकेनं उत्तर कोरियाची नाकेबंदी करायचा प्रयत्न केला. उत्तर कोरियातून कपड्यांची निर्यात, कच्च्या तेलाची आयात बंद करून परदेशात असलेली किम जोंग ऊन यांची संपत्ती गोठवली होती. परंतु तरीही उत्तर कोरियानं आण्विक कार्यक्रम सुरूच ठेवला. आंतरराष्ट्रीय स्तरावर वारंवार दहशतवादाचं समर्थन करणा-या देशांना या यादीत टाकण्यात येतं. इराण, सुडान, सीरिया या देशांची नावंसुद्धा दहशतवाद पुरस्कृत देशांच्या यादीत आहेत. 2008मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्लू बुश यांनी उत्तर कोरियाचं नाव या यादीतून हटवलं होतं. त्यावेळी उत्तर कोरियाचा आण्विक कार्यक्रम थांबवण्यावरही चर्चा सुरू होती. अमेरिकेच्या दबावाला न झुगारून उत्तर कोरियांनी स्वतःचा आण्विक कार्यक्रम सुरूच ठेवला आहे. त्यामुळे कोरियन द्विपकल्पातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तर कोरिया आणखी एका क्षेपणास्त्र चाचणीची तयारी करत आहे,असे वृत्त दक्षिण कोरियाच्या गुप्तचर खात्याने दिले होते.उत्तर कोरियाने तीन सप्टेंबरला शक्तीशाली हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्यानंतर हा तणाव आणखी वाढला. उत्तर कोरियाकडून सातत्याने अमेरिकेला युद्धाची धमकी दिली जात आहे. त्यामुळे अमेरिकेनेही उत्तर कोरियावर दबाव आणण्यासाठी अशा प्रकारचा युद्ध सराव सुरु केला आहे.
उत्तर कोरियाने फक्त युद्ध जरी पुकारलं तरी होईल लाखो लोकांचा मृत्यू उत्तर कोरिया अमेरिकेसहित संपुर्ण जगाला अणुबॉम्बची भीती दाखवत आहे. एका रिपोर्टनुसार, जर उत्तर कोरियाने युद्ध पुकारलं, आणि अणुबॉम्ब शस्त्रांचा वापर केला नाही तरी लाखो लोकांचा मृत्यू होईल. परिस्थिती इतकी भयानक असेल की, पहिल्याच दिवशी तीन लाख लोकांचा मृत्यू होईल.