प्योंगयांग:उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने पुन्हा एकदा आपला अण्वस्त्र कार्यक्रम सुरू केला आहे. अण्वस्त्रं असलेला उत्तर कोरिया आपल्या योंगब्योन प्लांटमध्ये प्लूटोनियमचं पुनरुत्पादन करत आहे. ही कोरियाची सर्वात मोठी 5 मेगावॅट अणुभट्टी आहे. डिसेंबर 2018 पासून अणुभट्टी बंद होती, पण आता सुरू करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्राच्या (यूएन) अणु एजन्सीनं उत्तर कोरियाच्या या हालचालीवर चिंता व्यक्त केली आहे.
ट्रम्प आणि किम यांची चर्चा अनिर्णीत
अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात अणुकराराबाबत अद्याप कोणताही करार झालेला नाही. उत्तर कोरियाचा सर्वोच्च नेता किम जोंग उन आणि अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अण्वस्त्र कार्यक्रमाच्या मुद्द्यावर चर्चा झाली होती. किंमनं डोनाल्ड ट्रम्प यांना योंगब्योनचा अणुप्रकल्प संपवण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु इतर प्रकल्पाबद्दल चर्चा झाली नव्हती.
उत्तर कोरियावर अनेकदा आंतरराष्ट्रीय निर्बंध लादले
किम जोंग उनच्या नेतृत्वाखाली उत्तर कोरियाचा आण्विक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम वेगानं वाढला आहे. यामुळे, या देशावर अनेक वेळा आंतरराष्ट्रीय निर्बंध लादले गेले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनं म्हटलं आहे की, जुलैच्या सुरुवातीपासून उत्तर कोरियाकडून सिग्नल येऊ लागले आहेत. तेथून मोठ्या प्रमाणात थंड पाणीही सोडण्यात येत होतं. याचा अर्थ अणुभट्टीनं काम सुरू केलं आहे.