North Korea: उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन (Kim Jong-un) याच्या अजब निर्णयांची चर्चा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. आता आणखी एका निर्णयामुळे किम जोंग उन चर्चेचा विषय ठरत आहे. उत्तर कोरियात आता पुढील ११ दिवस नागरिकांवर हसण्यावरच बंदी घातली आहे. देशातील नागरिकांनी जर कोणत्याही पद्धतीचं सेलिब्रेशन किंवा हसताना दिसले तर त्यांच्याकवर कडक कारवाई केली जाणार आहे. देशाचे माजी नेते आणि सध्याचा हुकूमशाह किम जोंग उन याचे वडील किम जोंग-इल (Kim Jong-il) यांच्या १० व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सरकारनं लोकांच्या हसण्यावर बंदी घातली आहे.
किम जोंग-इल यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ११ दिवस देशातील नागरिकांवर कोणत्याही पद्धतीचं सेलिब्रेशन, सण किंवा आनंद साजरा करण्यावर पूर्णपणे बंदी आहे. इतकंच नव्हे, तर नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू दिसता कामा नये असं फर्मान किम जोंग उन यानं काढलं आहे. ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू दिसेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असे आदेश किम जोंग यानं दिले आहेत. राष्ट्रीय शोक असल्यानं लोकांना हसण्यासोबतच मद्यमान करण्यावरही बंदी असणार आहे.
एका रिपोर्टनुसार हुकूमशाह किम जोंग उनच्या आदेशानुसार आज म्हणजेच १७ डिसेंबर रोजी देशातील नागरिकांना किराणा सामान खरेदी करण्यावर देखील बंदी आहे. राष्ट्रीय शोक असलेल्या काळात जर कुणी मद्यमान केलं किंवा कोणत्याही पद्धतीचा नशा करताना दिसलं तर तो व्यक्ती आजवर परत आलेला नाही अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. याशिवाय या काळात वाढदिवस, सेलिब्रेशन किंवा कोणत्याही पद्धतीचे सोहळे साजरे करण्याची परवानगी नाही. आदेशाचं उल्लंघन झाल्यास संबंधितांना अटक करण्यात येते आणि कठोर शिक्षा सुनावण्यात येते असं सांगितलं जातं. राष्ट्रीय शोक काळात पोलिसांची नागरिकांवर करडी नजर असते. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर उदासीनता आणि दु:ख दिसत नाही अशा व्यक्तींना पोलीस अटक करतात. अटक झालेले व्यक्ती परत कधीच येत नाहीत असं सांगितलं जातं.