हुकूमशहा किम जोंग उनचा देश असलेल्या उत्तर कोरियातील जनता त्रस्त आहे. कोरोना व्हायरसच्या साथीच्या काळात लादलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर आता उत्तर कोरियाच्या लोकांवर अन्नाचे संकट अधिक गडद झाले आहे. 1990 नंतर देशात पुन्हा एकदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या काळात किम जोंग-उनच्या सरकारने घातलेल्या निर्बंधांना कंटाळलेल्या तिथल्या नागरिकांनी गुप्तपणे बीबीसीला त्यांच्या स्थितीबद्दल सांगितले आहे.
कोरोना महामारीच्या काळात 2020 मध्ये उत्तर कोरियाच्या सीमा सील केल्यानंतर, तेथे अन्न पुरवठ्याअभावी लोक उपासमारीने मरत आहेत. 2020 मध्ये कोविड-19 साथीच्या आजाराची सुरुवात झाल्यानंतर उत्तर कोरियाने आपल्या सीमा सील केल्या. त्यामुळे चीनमधून होणारी धान्याची आयात बंद करण्यात आली. सीमा सील केल्यामुळे आवश्यक खते आणि यंत्रसामग्रीचे भागही आयात करता आले नाहीत. आपल्या 26 मिलियन नागरिकांना अन्न पुरवण्यासाठी धडपडणाऱा उत्तर कोरिया पुरेसे धान्य उत्पादन करत नाही.
लीना ह्युमन राइट्स वॉचच्या वरिष्ठ संशोधक यांनी सीएनएनला सांगितले, "उत्तर कोरियाने आपल्या सीमा उघडल्या पाहिजेत. त्यांना व्यापार पुन्हा सुरू करण्याची गरज आहे. पूर्वस्थिती पूर्ववत करण्यासाठी शेतीमध्ये सुधारणा केल्या पाहिजेत. तिथल्या लोकांना खायला अन्न नाही, पण सध्या ते त्यांच्या सीमा बंद ठेवण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे तिथे लोकांवर अत्याचार होत आहेत."
उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमध्ये राहणाऱ्या एका महिलेने बीबीसीला तीन जणांच्या कुटुंबाविषयी सांगितले ज्यांचा घरात उपासमारीने मृत्यू झाला. "आम्ही त्याला पाणी देण्यासाठी त्याचा दरवाजा ठोठावला, पण कोणीही उत्तर दिले नाही. अधिकारी आत गेले तेव्हा त्यांना तो मृत दिसला," चिनी सीमेजवळ राहणाऱ्या एका मजुराने सांगितले की अन्न पुरवठा इतका कमी आहे की त्याच्या गावातील पाच लोक आधीच उपासमारीने मरण पावले आहेत. 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात, उत्तर कोरियामध्ये दुष्काळ पडला होता, ज्यामध्ये सुमारे 30 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.