उत्तर कोरियानं गुरुवारी गेल्या दोन वर्षात पहिल्यांदाच देशात कोरोना रुग्ण आढळल्याची अधिकृत माहिती जाहीर केली आहे. देशाच्या सरकारी माध्यमांमध्ये देण्यात आलेल्या बातमीनुसार उत्तर कोरियात आता 'गंभीर राष्ट्रीय आपत्कालीन घटना' जाहीर करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा जगभर प्रकोप सुरू होऊन आता दोन वर्ष होऊन गेली आहे. पण आजवर उत्तर कोरियानं देशातील कोरोना परिस्थितीबाबत कधीच अधिकृत माहिती दिली नव्हती. आज पहिल्यांदाच उत्तर कोरियानं देशात कोरोना रुग्ण आढळल्याची कबुली दिली आहे. संबंधित रुग्ण ओमायक्रॉन व्हेरिअंटचा असल्याची माहिती अधिकृत KCNA वृत्त समूहानं दिली आहे.
KCNA नं दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी राजधानी प्योंगयांगमध्ये अनेक लोक ओमायक्रॉन व्हेरिअंटनं संक्रमित झाल्याची माहिती मिळाली आहे. देशाचे हुकुमशाह किम जोंग उन यांनी कोविड निवारण उपायांना अत्यंत कठोरपणे राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. किमने सत्तारुढ कोरियाई वर्कर्स पार्टीच्या ब्युरोची एक बैठक बोलावली. यात सदस्यांनी अँटी-व्हायरस उपयायोजनांवर भर देण्याचा सल्ला दिला. या बैठकीत किम यांनी अधिकाऱ्यांना कोविडचा प्रसार होण्यास आळा घालण्याच्या आणि संक्रमण लवकरात लवकर नष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. डेली मिररच्या अहवालानुसार लोकांना घराबाहेर येण्यास मज्जाव करण्यात आला आहे आणि देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
"देशात सर्वात मोठी आपत्कालीन घटना घडली आहे. फेब्रुवारी २०२० पासून दोन वर्ष आणि तीन महिने देशाला सुरक्षित ठेवण्यात यश आलं होतं. पण आता यात घुसखोरी झाली आहे", असं सरकारी माध्यमांनी सांगितलं आहे. उत्तर कोरियात आता नेमके किती रुग्ण आढळले आहेत याची माहिती देण्यात आलेली नाही. देशात अपुऱ्या आरोग्य सुविधा आणि संपूर्ण जगापासून वेगळं राहण्याच्या आपल्या भूमिकेमुळे किम जोंग चिंतित आहेत. या दोन कारणांमुळे कोरोनाचा वाईट प्रभाव संपूर्ण देशावर पडू शकतो असं किम जोंग यांना वाटतं. कोरोनाला देशाच्या सीमेवरच रोखण्यात यशस्वी झाल्याचा दावा आतापर्यंत उत्तर कोरिया करत आलं होतं. पण आता अधिकृतरित्या कोरोना रुग्ण आढळल्याचं मान्य केल्यानंतर भविष्यात होणाऱ्या घटनाक्रमांवर सर्वांचं लक्ष लागून असणार आहे.