ऑनलाइन लोकमत -
सियोल, दि. १८ - उत्तर कोरियाने शुक्रवारी मध्यम श्रेणीच्या क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र समुद्रात सोडण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन यांनी काही दिवसांपुर्वी आण्विक हल्यासाठी आपली क्षमता वाढवण्याचे आदेश दिल्यानंतर शुक्रवारी ही चाचणी करण्यात आली.
सुकटोन शहरातून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आलं. स्थानिक वेळेनुसार सकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी ही चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्राने 800 किमी प्रवास केला. हे क्षेपणास्त्र पुर्व नदीमध्ये सोडण्यात आलं. या नदीला जापानचा समुद्र म्हणूनही ओळखलं जात अशी माहिती मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली आहे.
मात्र हे कोणत्या प्रकारचं क्षेपणास्त्र होतं याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. दक्षिण कोरियाच्या न्यूज एजंसीने दिलेल्या माहितीनुसार हे रोडाँग क्षेपणास्त्र होतं ज्याची क्षमता 1,300 किमी आहे. याअगोदरही नियमांचं उल्लंघन करत उत्तर कोरियाने अलीकडेच हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली होती. उत्तर कोरियाने अग्निबाणाच्या मदतीने पृथ्वी निरीक्षण उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात सोडला असून जगातील अनेक देशांनी ही आंतरखंडीय क्षेपणास्त्राचीच छुपी चाचणी होती असे सांगून निषेध केला आहे.