धर्मनिरपेक्षता किंवा सेक्युलॅरिझम म्हणजे काय? आजवर यासंदर्भात बरीच चर्चा झाली आहे. याविषयी अनेकांच्या काही धारणा आहेत, तसे मतभेदही आहेत. धर्मनिरपेक्षता म्हणजे निधर्मीपणा किंवा सर्वधर्मसमभाव अशाही त्याच्या व्याख्या केल्या जातात. पण सर्वसाधारणपणे धर्मनिरपेक्षता म्हणजे कोणत्याही धर्माचा अनुनय न करणे आणि कुठल्याही धर्माचा द्वेषही न करणे. प्रत्येकाला आपापल्या धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य म्हणजे धर्मनिरपेक्षता. यामध्ये ज्याप्रमाणे कुठल्याही धर्माचा उदोउदो नाही, त्याचप्रमाणे एखाद्या धर्माबद्दल कटुताही नाही. भारतीय घटना धर्मनिरपेक्षतेला प्राधान्य देते तसेच अन्यही काही देश आपण धर्मनिरपेक्ष आहोत असे म्हणतात. उदाहरणार्थ उत्तर कोरिया. या देशातही ‘धार्मिक स्वातंत्र्य’ आहे. त्यांची घटनाच तसे सांगते. पण प्रत्यक्षात काय दिसतं?..
उत्तर कोरिया हा तसा कम्युनिस्ट देश. किम जोंग उन हा या देशाचा सर्वेसर्वा. त्याच्या हडेलहप्पीपणाच्या आणि मनमानी तऱ्हेवाइकपणाच्या अनेक घटना संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. आपल्या क्रूरतेबद्दलही तो कुप्रसिद्ध आहे. अमेरिकेने नुकताच ‘आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य अहवाल’ प्रसिद्ध केला आहे. यात उत्तर कोरियाच्या धार्मिक स्वातंत्र्याबद्दलही विस्ताराने माहिती आहे. ‘कोरिया फ्यूचर’ या स्वयंसेवी संस्थेच्या आधाराने अनेक वास्तव घटनांचा संदर्भ यात दिला आहे. मुळात उत्तर कोरियाने आपल्या चारही बाजूने कडोकोट बंदिस्ती लावली आहे. चीनप्रमाणेच याही देशातून कोणताही मजकूर, कोणतीही माहिती सरकारच्या परवानगीशिवाय बाहेर जात नाही. जी काही माहिती बाहेर जगापपर्यंत जाते ती फिल्टर होऊन. म्हणजेच स्वत:च्या सोयीची. हा अलिखित कायदा जर कोणी मोडला तर त्याची शंभरी भरलीच म्हणून समजायची.
‘कोरिया फ्यूचर’ या संघटनेने उत्तर कोरियासंदर्भात बरेच काम केले आहे. तिथल्या लोकांशी बोलून, माहिती घेऊन याशिवाय प्रत्यक्ष अनुभवातून या संघटनेने आपली निरीक्षणे नोंदवली आहेत. ‘कोरिया फ्यूचर’ या संघटनेचे म्हणणे आहे, उत्तर कोरियात अनेक धर्मियांवर अनन्वित अत्याचार केले जातात. त्यात पहिल्या क्रमांकावर आहेत ते ख्रिश्चनधर्मीय. केवळ या धर्माचे आहेत, म्हणून त्यांच्याबाबत दुजाभाव केला जातो. अनेक बाबतीत त्यांच्यावर अन्याय केला जातो.
‘कोरिया फ्यूचर’ या संघटनेने सांगितलेल्या एका घटनेवरुन तर सध्या संपूर्ण जगात खळबळ माजली आहे. उत्तर कोरियात राहणारे एक ख्रिश्चन कुटुंब. अर्थातच बायबलवर त्यांची श्रद्धा. पण केवळ बायबल जवळ बाळगले म्हणून या कुटुंबाला अतिशय कडक शिक्षा देण्यात आली. या संपूर्ण कुटुंबाला जन्मठेप सुनावण्यात आली आणि त्यांना कोठडीत टाकण्यात आले. आता यात दोन वर्षांच्या मुलाची काय चूक? त्याला तर काहीच कळत नाही, पण या छोट्याशा मुलालाही जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. अर्थात, ही घटना आहे २००९ची. पण या एकाच घटनेवरुन उत्तर कोरियामध्ये काय चालले आहे, याचा अंदाज बांधता येतो. अनेक माहीतगारांचे म्हणणे आहे, ही तर फारच लहान, म्हटलं तर अतिशय ‘क्षुल्लक’ गोष्ट, पण यापेक्षाही भयानक गोष्टी उत्तर कोरियात घडताहेत आणि बाहेरच्या जगाला त्याचा थांगपत्ताही नाही. ही एकच ‘छोटीशी’ गोष्ट तब्बल १४ वर्षांनी जगाच्या समोर आली, प्रत्यक्षात तिथे काय घडत असेल?
उत्तर कोरियात विविध धर्मियांचा, त्यातही महिलांचा अतिशय छळ केला जातो. त्यांनी आपल्या धर्माचे पालन केले नाही तर त्यांना नको त्या गोष्टी सोसाव्या लागतात. लेबर कॅम्पमध्ये पाठवून त्यांच्याकडून बळजबरी मजुरी करवून घेतली जाते. महिलांचे लैंगिक शोषण केले जाते. अमूक अमूक धर्माचे लोक माणसाचे रक्त पिणारे (रक्तपिपासू), खुनी, बलात्कारी असतात, आहेत, त्यांच्याशी संपर्क ठेवणाऱ्यांनाही कायद्याचा बडगा दाखवला जाईल, असे धमकावले जाते. कुठल्याही कारणाशिवाय पाच ते १५ वर्षांपर्यंत तुरुंगात टाकले जाते. एवढेच नाही, काही गुन्ह्यांची शिक्षा तर पुढच्या तीन पिढ्यांना दिली जाते! म्हणजे समजा उत्तर कोरिया सरकारच्या मते एखाद्याने काही गुन्हा केला, तर त्या व्यक्तीला तर शिक्षा होईलच, पण त्याचा मुलगा आणि त्याच्या नातवालाही ही शिक्षा भोगावी लागेल!
शिक्षेचा आणखी एक अमानुष प्रकार म्हणजे ‘गुन्हेगारा’ला झोपूच न देणे! काहीही करून त्याला जागंच ठेवणे. त्याला डुलकी लागली, डोळे मिटायला लागले की लगेच रट्टे देणं. या असल्या छळाने एका महिलेने नुकतीच आत्महत्याही केली!
‘फटके’ पाहा, अन्यथा तुम्हालाही फटके! ‘कोरिया फ्यूचर’ या संघटनेने अनेक उत्तर काेरियन महिलांचे प्रत्यक्ष इंटरव्ह्यूदेखील घेतले. प्रत्येकाची कहाणी इतरांपेक्षा भयंकर! भर चौकात फटके देणे, ‘गुन्हेगारा’ला सर्वांसमक्ष गोळ्या घालणे किंवा फासावर लटकवणे! ही जाहीर शिक्षा पाहण्याचीही सक्ती. ही शिक्षा पाहायला एखादी व्यक्ती आली नाही, तर तिलाही भरचौकात तीच शिक्षा!