बीजिंग - उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची मंगळवारी (27 मार्च) बीजिंग येथे भेट घेतली. चीन सरकारे अधिकृत वृत्तसंस्था असलेल्या 'शिन्हुआ'नं उत्तर कोरिया व चीनच्या शिष्ठमंडळादरम्यान झालेल्या चर्चेचे छायाचित्रही प्रसिद्ध केले आहेत. या भेटीमध्ये किम जोंग यांनी अण्वस्त्र प्रसारबंदीचा संकल्प केल्याचे वृत्त असून कोरियन द्विपकल्पात शांतता राहावी, यासंदर्भातही दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
शिन्हुआनं दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेसोबत वाटाघाटी करण्यास तयार असल्याचं किम जोंग उन यांनी बैठकीनंतर सांगितले, तसंच ते दोन्ही देशांचं एक संयुक्त संमेलनही भरवण्यास इच्छुक आहेत. तर चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग म्हणालेत की, बदललेल्या या परिस्थितींमध्ये ते उत्तर कोरियाशी नियमित स्वरुपातील संपर्क ठेऊ इच्छितात. उत्तर कोरियासोबत विभिन्न माध्यामांद्वारे संपर्क वाढवण्याची इच्छादेखील त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी चीनला गुप्त भेट दिल्याची चर्चा रंगली होती. किम जोंग हे विशेष रेल्वे ट्रेनने चीनला पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. चीननेही किम जोंग उन यांच्या दौऱ्याबाबत कोणतीही माहिती नाही, असे म्हटले होते. जर ते चीन दौऱ्यावर असतील तर त्याची माहिती लवकरच प्रसारित केली जाईल, असे चीनच्या वतीने सांगण्यात आले होते.
यानुसार, चीनमधील वृत्तसंस्थेने अखेर किम जोंग उन यांच्या चीन दौऱ्याबाबत वृत्त दिले आहे. या दौऱ्यात किम जोंग यांनी अण्वस्त्र प्रसारबंदीचा संकल्पही केला. या मोबदल्यात चीनने उत्तर कोरियाशी संबंध सुधारण्याचे आश्वासन दिले.