प्याँगयाँग - अण्वस्त्र हल्ल्याची धमकी व आपल्या ताकदीचे वारंवार प्रदर्शन करुन अमेरिकेसहीत जगभरातील अन्य देशांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करणारे उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. किम जोंग यांनी आपली अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर कोरियाच्या अधिकृत कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार, अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्रांची चाचणी शनिवारपासून थांबवण्यात येणार आहेत. म्हणजे आजपासून उत्तर कोरियामध्ये होणाऱ्या सर्व अण्वस्त्रांच्या चाचण्या थांबवण्यात येणार आहेत.
किम जोंग उन यांनी हा निर्णय देशहितासाठी घेतल्याचे बोलले जात आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय मुद्यांवर लक्ष्य केंद्रीत करण्याच्या उद्देशानं किम जोंग उन यांनी निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. किम जोंग उन यांनी घेतलेला हा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. दरम्यान, दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशांचे राष्ट्राध्यक्ष पुढील आठवड्यात पॅन्मुन्जोम येथे भेटणार आहेत. या भेटीपूर्वीच किम जोंग उन यांनी हा निर्णय घेतला आहे.
(किम जोंग उन यांच्याशी बोलेन, पण...! डोनाल्ड ट्रम्प यांची सशर्त चर्चेची तयारी)
डोनाल्ड ट्रम्प यांनी केले निर्णयाचे स्वागत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग उन यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ''उत्तर कोरियानं अण्वस्त्रांची चाचणी थांबवण्यास तयारी दर्शवली आहे. हा निर्णय उत्तर कोरिया आणि जगभरासाठी अत्यंत चांगली बातमी आहे'', असे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून किम जोंग उन जगभरातील दुसऱ्या देशांसोबत नातेसंबंध सुधारण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले आहे. 2011 मध्ये सत्ता सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांनी पहिल्यांदाच परदेश दौरे केले. मार्च महिन्यात चीनच्या दौऱ्यावर होते. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची 27 मार्चला त्यांनी बीजिंग येथे भेट घेतली.
दरम्यान, किम जोंग दक्षिण कोरियाच्या अध्यक्ष आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. या नियोजित भेटीपूर्वी किम जोंग उन यांनी आपल्या वादग्रस्त अण्वस्त्र चाचण्या थांबवल्या आहेत. किम जोंग उन यांचा हा निर्णय संपूर्ण जगासाठी दिलासादायक असाच आहे. विशेषत: अमेरिकासाठी हा निर्णय मोठा मानला जात आहे, कारण किम जाहीररित्या ट्रम्प यांना युद्धांची वारंवार धमकी द्यायचे.ट्रम्प अध्यक्ष बनताच उन यांच्याशी त्यांचा शाब्दिक संघर्ष सुरू झाला होता. ट्रम्प यांनी उन यांनी अण्वस्त्रांच्या व क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्यापासून ‘रॉकेट मॅन’ असाच त्यांचा उल्लेख केला आहे. किम जोंग यांनी माझ्या टेबलवर अण्वस्त्राची कळ (बटण) आहे, असे म्हटले होते, त्यावर ट्रम्प यांनी माझ्याकडे त्याच्यापेक्षाही मोठी कळ असल्याचे म्हटले होते.