टोकियो, दि. 3 - उत्तर कोरियाने आपल्या आक्रमक कारवाया सुरूच ठेवताना आज पुन्हा एकदा अणुचाचणी घेतली आहे. जपानने उत्तर कोरियाकडून घेण्यात आलेल्या सहाव्या अणुचाचणीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान उत्तर कोरियानेही आज घेतलेली अणुचाचणी यशस्वी झाल्याचे म्हटले आहे. उत्तर कोरियाने आज घेतलेल्या हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीतील स्फोटाची शक्ती ही त्यांच्या आधीच्या अणुचाचणीच्या तुलनेत दहापट अधिक होती.जपानचे परराष्ट्रमंत्री तारो कोनो यांनी सांगितले की, हवामान खाते आणि अन्य ठिकाणांहून आलेल्या माहितीनंतर जपान सरकार उत्तर कोरियाकडून करण्यात आलेल्या अणुचाचणीच्या वृत्ताला दुजोरा देत आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार उत्तर कोरियाने परीक्षण केलेल्या हायड्रोजन बॉम्बची क्षमता आधी परीक्षण करण्यात आलेल्या अणुस्फोटांपेक्षा 9 पट अधिक होती. उत्तर कोरियाने याआधी अणुचाचण्या केलेल्या ठिकाणी जमीन हलल्याची माहिती भूकंपतज्ज्ञांना मिळाली आहे. त्याबरोबरच चीन आणि अमेरिकेनेही हा एक स्फोट असल्याचे सांगितले आहे.
उत्तर कोरियाकडून आज हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी घेण्यात आली. हा बॉम्ब नव्वाने विकसित करण्यात आलेल्या आंतरखंडीय क्षेपणास्रावरून वाहून नेता येईल अशा पद्धतीने तयार करण्यात आला आहे. तसेच तो आधीच्या अणुचाचण्यांपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. असे कोरियाकडून सांगण्यात आले. किम जोंग उन यांच्या आदेशानुसार घेण्यात आलेली हायड्रोजन बॉम्बची चाचणी पूर्णपणे यशस्वी आणि देशाच्या अणुकार्यक्रमाच्या दृष्टीने अर्थपूर्ण ठरली आहे, असे कोरियन वृत्तवाहिनीने सांगितले.