प्योंगयांग, दि. 7- उत्तर कोरियावर कडक निर्बंध लादण्याचा ठराव संयुक्त राष्ट्राने मंजूर केल्यानंतर उत्तर कोरियाने तीव्र शब्दांमध्ये प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या ठरावाचा शिल्पकार असणाऱ्या अमेरिकेला याची हजार पटीने किंमत मोजावी लागेल अशी धमकीच उत्तर कोरियाने सोमवारी दिली आहे.
संयुक्त राष्ट्राने मंजूर केलेला ठराव म्हणजे आमच्या सार्वभौमत्त्वावर घातलेला घालाच आहे असे उत्तर कोरियाच्या अधिकृत वृत्तसंस्था केसीएनएने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्राने संमत केलेल्या या ठरावामागे असणाऱ्या अमेरिकेच्या भूमिकेवरही केसीएनएने जबरदस्त प्रहार केला आहे. आम्ही कोणत्याही प्रकारे आमचा संरक्षणासाठी असलेला अणूकार्यक्रम चर्चेच्या टेबलवर येऊ देणार नाही असे स्पष्ट करत अमेरिकेला याची हजारपटीने किंमत मोजावी लागेल अशी धमकीच दिली आहे. इकडे फिलिपाइन्समध्ये सुरु असलेल्या आसिआनच्या बैठकीमध्ये दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्री कांग क्युंग व्हा यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यास उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री रि योंग हो यांनी नकार दिली आहे.
(मनिला येथे आसिअान बैठकीसाठी आलेले उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्री रि योंग हो )
अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट रेक्स टिलरसनसुद्धा आसिआनमध्ये आहेत. तेथे बोलताना रेक्स म्हणाले, संयुक्त राष्ट्राच्या ठरावाला रशिया आणि चीननेसुद्धा पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय समुहात उत्तर कोरियाबाबत कोणतीही संदिग्धता नाही. उत्तर कोरियाने अणुचाचण्या थांबवून चर्चेला होकार देणे हाच सर्वात चांगला उपाय ठरेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कोरियन अध्यक्ष मून जाई-इन यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि त्यामध्ये उत्तर कोरियाचा अणू कार्यक्रम थेट धोका निर्माण करत असलेल्या विधानावर त्यांचे एकमत झाले. 4 जुलै रोजी उत्तर कोरियानं केलेल्या आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाइल परीक्षण घेतल्यानंतर हा प्रस्तावाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. मात्र मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी 28 जुलै रोजी उत्तर कोरियानं पुन्हा एकदा बॅलिस्टिक मिसाइल परीक्षण केलं. संयुक्त राष्ट्रानं 2006 पासून आतापर्यंत उत्तर कोरियावर जवळपास सात वेळा निर्बंध लादले आहेत. उत्तर कोरिया लवकरच मध्यम श्रेणीच्या बॅलिस्टिक मिसाइल मोठ्या प्रमाणात बनवण्याच्या तयारीत आहे. आम्ही बनवणा-या मिसाइल जपानवर हल्ला करण्यासाठी सक्षम असून, या मिसाइल अमेरिकन सेनेच्या मुख्य ठिकाणांनाही लक्ष्य करणार असल्याचं उत्तर कोरियानं म्हटलं होतं. उत्तर कोरियानं गेल्या आठवड्यात मिसाइल परीक्षण केलं असून, एका आठवड्यात उत्तर कोरियानं दोनदा मिसाइल परीक्षण केलं होतं.
संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार उत्तर कोरियावर कोणती बंधने येतील1)उत्तर कोरियाकडून कोळसा, मासे, लोहखनिज आणि शिसं कोणालाही आयात करता येणार नाही2)उत्तर कोरियन कंपन्या किंवा व्यक्तींबरोबर जॉइंट व्हेंचर स्थापन करता येणार नाही3)सध्याच्या जॉइंट व्हेंचर्समध्ये कोणतीही नवी गुंतवणूक करण्यास बंदी