न्यू यॉर्क : भारताने आज पाकिस्तानकडे इशारा करताना उत्तर कोरियाच्या आण्विक प्रसारसंबंधांची चौकशी करण्याची मागणी केलीआहे. उत्तर कोरियाने शुक्रवारी जपानवरून मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र डागले. या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ही मागणी केली आहे.परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले की, सुषमा स्वराज यांनी उत्तर कोरियातील या घटनाक्रमाचा निषेध केला. त्यांनी मागणी केली की, उत्तर कोरियाच्या प्रसारसंबंधी हालचालींचा तपास लावायला हवा. याची जबाबदारी निश्चित करायला हवी. अमेरिकेचे विदेशमंत्री रेक्स टिलरसन आणि त्यांचे जपानी समकक्ष तारो कोनो यांच्यासोबतच्या त्रिपक्षीय बैठकीत त्यांनी ही मागणी केली. संयुक्तराष्ट्र महासभेच्या सत्रात ही चर्चा झाली.रवीश कुमार यांनी या वेळी कोणत्याही देशाचा उल्लेख केला नाही, पण आपण कोणाबाबत बोलत आहोत, याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. ते म्हणाले की, आम्ही केवळ उत्तर कोरियाबाबत बोलत नाहीत, तर त्यांच्या प्रसारासंबंधी हालचालींची चौकशी व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे.संयुक्त राष्ट्र महासभेच्या सत्रादरम्यान परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाच देशांच्या विदेशमंत्र्यांशी चर्चा केली. यात ट्युनिशिया, बहरीन, लातविया, संयुक्त अरब अमिरात आणि डेन्मार्क यांच्या मंत्र्यांचा समावेश होता. ही चर्चा द्विपक्षीय संबंधांवर केंद्रित होती. भविष्यात फार्मा, वस्त्र, जैव, ऊर्जा आणि माहिती तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रात सहकार्य करण्यावर चर्चा झाली.>इवांका ट्रम्प यांची भेटपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी व सल्लागार इवांका ट्रम्प यांच्यात येथे चर्चा झाली. संयुक्त राष्ट्र महासभेच्या वार्षिक सत्रादरम्यान ही भेट झाली. भारतात नोव्हेंबरमध्ये जागतिक उद्योजकता शिखर संमेलन होत आहे. यात अमेरिकी प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व इवांका या करणार आहेत. दोन्ही देशातील महिला उद्योजकता आणि कार्यबळ यावर त्यांनी चर्चा केली. इवांका यांनी सुषमा स्वराज यांचा उल्लेख ‘करिश्माई’ व्यक्तिमत्त्व असा केला.
उत्तर कोरियाला पाकिस्तानचे आण्विक साह्य?, चौकशीची मागणी; सुषमा स्वराज यांनी उपस्थित केला मुद्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 4:29 AM