स्योल/डेट्रॉइट : उत्तर कोरियाचे हुकुमशाही नेते किम ज्याँग ऊन यांच्याशी आपली शिखर बैठक कदाचित येत्या तीन-चार आठवड्यात होईल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकीकडे सांगत असतानाच दुसरीकडे उत्तर कोरियाने त्यांचे वादग्रस्त प्युंग्ये-री भूमीगत अणूचाचणी केंद्र येत्या महिन्यांत बंद करण्याची हमी दिली आहे. मात्र हे पाऊल शिखर बैठकीआधी उचलले जाईल की नंतर हे मात्र स्पष्ट नाही.उत्तर कोरियाने त्यांचे अण्वस्त्रे व क्षेपणास्त्रे विकसित करण्याचे कार्यक्रम बंद करावेत यासाठी दक्षिण कोरिया, जपान व अमेरिका हे एकत्रितपणे दबाव आणत आहेत. दोनच दिवसांपूर्वी किम ज्याँग उन दक्षिण कोरियात गेले व तेथे त्यांनी त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष मून जाये इन त्यांच्याशी चर्चा करून कोरियन उपखंड अण्वस्त्रमुक्त करण्याची तयारी दर्शविली होती. द. कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते यून याँग चॅन यांनी स्योलमध्ये सांगितले की, मून यांच्यासोबत चर्चेत किम यांनी अशी हमी दिली की, प्युंग्ये-री अणुचाचणी केंद्र कायमचे बंद करण्याचे काम मे महिन्यात हाती घेतले जाईल.ट्रम्प यांनी खडसावलेकाही महिन्यांपूर्वी अण्वस्त्र सोडण्याची धमकी देणारे किम आता बैठकीसाठी उतावीळ झाले आहे, पण उत्तर कोरिया अण्वस्त्रे पूर्णपणे नष्ट करण्यात जराही टाळाटाळ करत असल्याचे जाणवले तर अमेरिका चर्चेतून माघार घेईल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी मिशिगन राज्यात झालेल्या सभेत बजावले.
उत्तर कोरिया बंद करणार वादग्रस्त अणुचाचणी केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 2:21 AM