स्योल : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा नेते किम जाँग उन यांच्या १२ जून रोजी सिंगापूरमध्ये होणाऱ्या शिखर बैठकीसाठी अनुकूल असे आश्वासक वातावरण तयार करण्यासाठी उत्तर कोरियाने आपले अणुचाचणी केंद्र येत्या दोन आठवड्यांत कायमचे बंद करण्याची घोषणा रविवारी केली. ट्रम्प यांनी टिष्ट्वट करून या ‘मोठ्या मनाच्या कृती’चे स्वागत करून उत्तर कोरियाला धन्यवाद दिले.उत्तर कोरियाच्या सरकारी प्रसार माध्यमांनी यासंबंधी परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेले एक निवेदन प्रसिद्ध केले. त्यानुसार उत्तर कोरियाच्या ईशान्य भागात असलेल्या प्युंगे-री भूमीगत अणुचाचणी केंद्राची सर्व भुयारे स्फोटाने उद््ध्वस्त केली जातील. तसेच निरीक्षण आणि संशोधन यासाठी तेथे उभारलेल्या इमारती पाडून टाकल्या जातील व तेथील लष्करी पाहरा हटविला जाईल.हवामान अनुकूल असेल तर अणुचाचणी केंद्र उद््ध्वस्त करून कायमचे बंद करण्याचा हा ‘समारंभ’ २३ आणि २५ मे दरम्यान आयोजित केला जाईल. एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष हजर राहून खात्री करण्यासाठी त्यावेळी अमेरिका, दक्षिण कोरिया.चीन, रशिया आणि ब्रिटनच्या माध्यम प्रतिनिधींनाही त्यावेळी आमंत्रित केले जाईल, असे या निवेदनात नमूद करण्यात आले.गेल्या महिन्यात किम ज्याँग उन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून यांच्या भेटीच्या वेळी अणुचाचणी केंद्र बंद करण्याच्या वेळी आंतरराष्ट्रीय अणुतज्ज्ञांनाही बोलावले जाईल, असे किम यांनी सांगितल्याने दक्षिण कोरियाने म्हटले होते. मात्र परराष्ट्र मंत्रालयाच्या या ताज्या घोषणेत अशा तज्ज्ञांना निमंत्रण देण्याचा उल्लेख नाही.कोरियन उपखंड आणि संपूर्ण जगात शांतता व स्थैर्य सुनिश्चित व्हावे यासाठी उत्तर कोरिया शेजारी देशांची व आंतरराष्ट्रीय समुदायाशी घनिष्ट संपर्क ठेवून चर्चा करण्यात पुढाकार घेईल, असेही उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले.
उत्तर कोरिया दोन आठवड्यांत बंद करणार अणुचाचणी केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 2:14 AM