ऑनलाइन लोकमत -
सियोल, दि. ११ - उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन यांनी आण्विक हल्यासाठी आपली क्षमता वाढवण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे. उत्तर कोरियाने केलेल्या क्षेपणास्त्राच्या चाचणीची पाहणी केल्यानंतर किम जोंग-उन यांनी हे आदेश दिल्याचं केसीएनए या वृत्तसंस्थेने दिली आहे.
उत्तर कोरियाने क्षेपणास्त्राची चाचणी नेमकी कधी केली याची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र गुरुवारी 2 क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यात आली ज्यांनी 500 किमीपर्यंत उड्डाण केले आणि त्यानंतर त्यांना समुद्रात सोडण्यात आलं असल्याचं केसीएनए या वृत्तसंस्थेने सांगितलं आहे.
'आपल्या कामाला गती द्या आणि आण्विक हल्याची क्षमता वाढवा. लढाऊ तुकडीने आण्विक स्फोटाची चाचणी सुरु ठेवावी जेणेकरुन त्यांची क्षमता कळेल' असं किम जोंग-उन बोलले असल्याचं कळलं आहे.
याअगोदरही नियमांचं उल्लंघन करत उत्तर कोरियाने अलीकडेच हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली होती. उत्तर कोरियाने अग्निबाणाच्या मदतीने पृथ्वी निरीक्षण उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात सोडला असून जगातील अनेक देशांनी ही आंतरखंडीय क्षेपणास्त्राचीच छुपी चाचणी होती असे सांगून निषेध केला आहे. या चाचणीमुळे उत्तर कोरिया अमेरिकेवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने मारा करू शकतो. आंतरराष्ट्रीय समुदाय उत्तर कोरियाला शिक्षा करण्यासाठी प्रयत्नशील असून अनेक र्निबध आधीच लादले आहेत, त्यात आता भर पडणार आहे.