उत्तर कोरियाचे छुपे सैनिक रशियाच्या साथीला!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 09:28 AM2024-10-29T09:28:36+5:302024-10-29T09:31:29+5:30

आपला प्रांत परत मिळवण्यासाठी रशिया प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे, पण त्यात त्यांना अजूनही फारसं यश मिळालेलं नाही. चिमुकला युक्रेन रशियाला अतिशय चिवट झुंज देतो आहे. 

North Korea's hidden soldiers with Russia! | उत्तर कोरियाचे छुपे सैनिक रशियाच्या साथीला!

उत्तर कोरियाचे छुपे सैनिक रशियाच्या साथीला!

जगातलं युद्धजन्य वातावरण कधी थांबेल याचा काहीच भरवसा नाही. एकीकडे इस्रायल-हमास युद्ध आणि दुसरीकडे रशिया आणि युक्रेन युद्ध. दोन्ही देश तर यात होरपळून निघताहेत, पण संपूर्ण जगालाही त्याचे चटके बसताहेत. त्याची धग आता वाढत चाललीय. इतर देशही त्यात ओढले जाऊ लागलेत. शिवाय ज्या देशाला प्रतिस्पर्धी देशाकडून फटका बसतोय, तो देश अधिकच पेटून उठतोय आणि बदल्याच्या भावनेनं अधिक तीव्र हल्ले करतोय.

रशिया आणि युक्रेन युद्धाचंच घ्या. अगोदर रशियानं युक्रेनवर बरेच हल्ले केले. त्यात युक्रेन काहीसं माघारलं, पण नंतर युक्रेननं पुन्हा उभारी घेऊन रशियावर प्रतिहल्ले केले. युक्रेननं ६ ऑगस्टला रशियाच्या कुर्स्क प्रांतावर केलेल्या हल्ल्यानं तर रशियाच्या नाकाला फारच मिरच्या झोंबल्या आहेत. कारण युक्रेननं कुर्स्कमधील तब्बल एक हजार चौरस किलोमीटर प्रांतावर आपला कब्जा केला आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर पहिल्यांदाच रशियाला एवढा मोठा झटका बसला आहे आणि त्यांचा इतका मोठा प्रदेश दुसऱ्या देशाच्या ताब्यात गेला आहे. आपला प्रांत परत मिळवण्यासाठी रशिया प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे, पण त्यात त्यांना अजूनही फारसं यश मिळालेलं नाही. चिमुकला युक्रेन रशियाला अतिशय चिवट झुंज देतो आहे. 

या युद्धात आता राजीखुशीनं म्हणा किंवा नाराजीनं म्हणा, इतर देशही सहभागी होत आहेत किंवा त्यांना सहभागी व्हावं लागतंय. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वालोदिमीर जेलेन्स्की यांनी नुकताच दावा केला आहे की, आमच्या यु्द्धात आता रशियाच्या बाजूनं दक्षिण कोरियाचे सैनिकही उतरताहेत किंवा त्यांना उतरवलं जातं आहे. दक्षिण कोरियाच्या बऱ्याच सैनिकांना या युद्धात रशियाच्या समर्थनार्थ तैनात करण्यात आलं आहे आणि आणखीही बरेचसे सैनिक उतरवले जातील. पाश्चिमात्य देशांनीही याबाबत चिंता व्यक्त करताना म्हटलं आहे, यामुळे युद्ध आणखी भडकण्याची आणि जगाच्या इतर भागातही, विशेषत: इंडो-पॅसिफिक क्षेत्रात याचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. 

जेलेन्स्की यांनीही नुकतंच म्हटलंय, उत्तर कोरियाच्या सैनिकांना आमच्याविरुद्ध लढण्यासाठी पाठवलं जात आहे. युक्रेनच्या मुख्य गुप्तहेर संस्थेनं दावा केलाय की, उत्तर कोरियानं नुकतेच आपले कडवे प्रशिक्षित बारा हजार सैनिक रशियाला पाठवले आहेत. त्यात पाचशे अधिकारी आणि तीन जनरल यांचा समावेश आहे. केवळ युक्रेनच नव्हे, तर अमेरिका आणि दक्षिण कोरियानंही या माहितीला दुजोरा दिला आहे. अमेरिकेनं म्हटलं आहे की, याव्यतिरिक्त दक्षिण कोरियाचे तीन हजार सैनिक आधीपासूनच रशियात तैनात आहेत आणि रशियाच्या बाजूनं युक्रेनविरुद्ध ते लढताहेत. यातल्या बऱ्याच सैनिकांना तर रशियातच खास ट्रेनिंग दिलं गेलंय आणि अजूनही दिलं जातंय. हे सैनिक सध्या रशियाच्या पूर्व भागात सज्ज आहेत. दक्षिण कोरियाच्या दाव्यानुसार उत्तर कोरियानं आपले बरेच सैनिक रशियाला पाठवले आहेत.

दक्षिण कोरियाची गुप्तहेर संस्था ‘नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिस’च्या (एनआयएस) गुप्त माहितीनुसार उत्तर कोरिया टप्प्याटप्यानं आपल्या सैनिकांना रशियात पाठवत आहे. ८ ते १३ ऑक्टोबरदरम्यान उत्तर कोरियाच्या १५०० सैनिकांची एक तुकडी  रशियन नौदलाच्या मदतीनं त्यांच्याच जहाजानं व्लादिवोस्तोक बंदरावर पोहोचवली गेली. हे सर्व सैनिक उत्तर कोरियाच्या स्पेशल मिशन फोर्सचा हिस्सा आहेत. याआधीही बरेच सैनिक रशियात दाखल झाले आहेत आणि अजूनही अनेक सैनिक रशियात येण्याच्या तयारीत आहेत. 

एनआयएसच्या माहितीनुसार, उत्तर कोरियाच्या या सर्व सैनिकांना रशियाची आर्मी केवळ प्रशिक्षणच देत नाहीये, तर त्यांना घातक शस्त्रास्त्रंही पुरवली आहेत. रशियन सैनिकांची वर्दी घालून ते फिरताहेत. त्यांना रशियन सैनिकांचं ओळखपत्रही देण्यात आलं आहे, रशियन वातावरणात रुळण्यासाठी त्यांच्याकडून कस्सून सराव करवून घेण्यात येत आहे. हे सर्व सैनिक सध्या व्लादिवोस्तोक उस्सुरिस्क, खाबरोवस्क आणि ब्लागोवेशचेंस्क लष्करी तळावर तैनात आहेत. एका मोठ्या सामूहिक हल्ल्याच्या तयारीत ते आहेत.

केवळ चर्चा करून उपयोग नाही.. 
हेकेखोर, हडेलहप्पी पुतिन आणि रशियानं युद्ध सुरू केलं, त्यांनीच ते थांबवावं अशी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांचं म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत जेलेन्स्की म्हणाले होते, यु्द्ध थांबवण्याबाबत पुतिन यांच्याशी केवळ चर्चा करून उपयोग नाही, ते माथेफिरू आहेत. स्वत:च्या देशाचं अपरंपार नुकसान होत असूनही, त्यांचे हजारो, लाखो सैनिक मारले जात असूनही ते स्वत: युद्ध थांबविणार नाहीत, त्यासाठी त्यांना बाध्य केलं पाहिजे.

Web Title: North Korea's hidden soldiers with Russia!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.