प्योंगयांग: उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांच्या प्रकृती अस्वास्थाबद्दल गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र शुक्रवारी ते जगासमोर आले. गेल्या २० दिवसांपासून ते कोणत्याही कार्यक्रमात दिसले नव्हते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दल वृत्त येत होतं. मात्र अखेर २० दिवसांनंतर ते एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याची बातमी उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेनं दिली. कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीनं (केसीएनए) दिलेल्या माहितीनुसार, किम जोंग उन सुनचिओनमध्ये एका खतं निर्मिती करणाऱ्या कारखान्याच्या उद्घाटनाला उपस्थित होते. हे ठिकाण राजधानी प्योंगयांगपासून जवळ आहे. यावेळी किम यांची बहिणदेखील उपस्थित होती. किम यांच्यानंतर त्यांच्या बहिणीकडे देशाची सूत्रं जाऊ शकतात, अशीदेखील चर्चा गेल्या काही दिवसांत जागतिक माध्यमांमध्ये सुरू होती.हृदयावरील शस्त्रक्रियेनंतर किम जोंग उन यांचा मृत्यू झाल्याचा दावा काही माध्यमांनी केला होता. तर किम यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती उत्तर कोरिया प्रशासनाकडून देण्यात येत होती. मात्र किम गेल्या २० दिवसांपासून जगासमोर न आल्यानं त्यांच्या प्रकृतीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होत्या. या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला. ११ एप्रिलपासून किम जगासमोर आले नव्हते. उत्तर कोरियामध्ये किम यांची हुकूमशाही राजवट असल्यानं अनेक गोष्टी गोपनीय ठेवल्या जातात. त्यामुळेच त्यांच्या प्रकृतीबद्दलची खात्रीलायक माहिती पुढे येत नव्हती. उत्तर कोरियातल्या वर्तमानपत्रांनी ११ एप्रिल रोजी किम यांचं छायाचित्र प्रसिद्ध केलं होतं. मात्र त्यानंतर त्यांचं कोणतंही छायाचित्र जगासमोर आलं नाही. या दिवसांत त्यांच्या प्रकृतीबद्दलचं वृत्त जागतिक माध्यमांनी दिलं होतं. मात्र याबद्दल उत्तर कोरियाच्या माध्यमांनी कोणतंही वृत्त दिलं नाही.
अखेर अफवांना पूर्णविराम; किम जोंग उन २० दिवसांनंतर जगासमोर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 7:54 AM