उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांच्यावर कार्डियोवेस्क्युलेरची शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली असल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. परंतु किम जोंग उन यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगत दक्षिण कोरियाने या वृत्ताचे खंडन केले होते. मात्र आता किम जोंग उन कोमात गेले असल्याचा दावा ब्रिटनच्या Dailymail या वृत्तपत्राने केला आहे.
उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती असतानाच चीनमधील डॉक्टरांचे एक पथक उत्तर कोरियाला रवाना झाले असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत.
किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबतच्या उलटसुलट चर्चा, दावे सुरूच आहेत. दक्षिण कोरियातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, किम जोंग उन हे जिवंत असून लवकरच लोकांसमोर येणार आहेत. किम जोंग उन हे लोकांसमोर येत नाहीत, याचा अर्थ त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, असा अर्थ होत नाही असेही या अधिकाऱ्याने सांगतिले.
दरदिवशी किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत विविध बातम्या येत आहेत. तसेच ह्यंग सॅन येथे किम जोंग उन यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमधील रुग्णालयात किम जोंग उनवर उपचार का केले नाहीत, असेही प्रश्न उपस्थित होत आहेत.