सोल : उत्तर कोरियाने रॉकेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून एक उपग्रह यशस्वीपणे स्थापित केला असल्याचा दावा केला आहे. तथापि, हे तर बॅलेस्टिक मिसाईल परीक्षण असल्याची शंका व्यक्त होत आहे. उत्तर कोरियाने मागील महिन्यातच हायड्रोजन बॉम्बचे परीक्षण करून आंतरराष्ट्रीय समुदायाची नाराजी ओढवून घेतली आहे. त्यातच आता पुन्हा रॉकेट प्रक्षेपण करून संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रस्तावांचे उल्लंघन केले आहे. दरम्यान, उपग्रह घेऊन जाणाऱ्या रॉकेटने यशस्वीपणे कक्षेत प्रवेश केला का? याला दुजोरा मिळू शकलेला नाही; पण अमेरिकेच्या एका संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे असे वाटते. दक्षिण कोरियानेही या रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणाबाबत साशंकता व्यक्त केली आहे. उत्तर कोरियातील सरकारी टीव्हीच्या वृत्तानुसार उपग्रह क्वांगम्योंव ४ कक्षेत स्थापित झाला आहे. रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन यांच्या आदेशानुसार हे प्रक्षेपण करण्यात आले. उमटले पडसाद...उत्तर कोरियाच्या या रॉकेट प्रक्षेपणाचा अनेक देशांकडून निषेध होत आहे. अमेरिकेने या कृतीला अस्थिरताकारक आणि भडकावू असल्याचे म्हटले आहे, तर जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी हे सहनशीलतेच्या पलीकडचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. उत्तर कोरियावर तात्काळ कारवाईची मागणी दक्षिण कोरियाने केली आहे.ब्रिटनचे विदेशमंत्री फिलीप हॅमंड म्हणाले की, उत्तर कोरियाच्या बॅलिस्टिक मिसाईलचा मी निषेध करतो. चीनने यावर खेद व्यक्त केला आहे. दरम्यान, उत्तर कोरियाबाबत नरमाईची भूमिका घेणाऱ्या रशियानेही या कृतीचा निषेध केला आहे. सुरक्षेसाठी हा मोठा आघात असल्याचे रशियाने म्हटले आहे, तर उत्तर कोरियाला जोरदार प्रत्युत्तर द्यायला हवे, अशी मागणी फ्रान्सने केली आहे.उत्तर कोरियाच्या रॉकेट प्रक्षेपणानंतर संयुक्त राष्ट्र संघाने न्यूयॉर्कमध्ये आपत्कालीन बैठक बोलावली आहे. हे प्रक्षेपण म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रस्तावांचे उल्लंघन असल्याचे जपान आणि अमेरिकेन म्हटले आहे.संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून यांनी उत्तर कोरियाच्या या कृतीवर टीका करीत म्हटले आहे की, उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करायला हवे.
जगाचा विरोध धुडकावून उत्तर कोरियाचे रॉकेट प्रक्षेपण
By admin | Published: February 08, 2016 3:28 AM