वॉशिंग्टन, दि. 4 - उत्तर कोरियाने आपली सर्वात शक्तिशाली अणुचाचणी यशस्वी झाली असल्याचा दावा केला आहे. उत्तर कोरिया आपल्या या शक्तिशाली शस्त्राच्या मदतीने बलाढ्य अमेरिकेवरही हल्ला करु शकतो. यासंबंधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जेव्हा तुम्ही उत्तर कोरियावर हल्ला करणार का ? असं विचारण्यात आलं तेव्हा, 'पाहून घेऊ' एवढंच काय ते उत्तर त्यांनी दिलं. बीजिंग आपल्या शेजारी राष्ट्रावर दबाव आणेल अशी अपेक्षा डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. उत्तर कोरियासोबत व्यवहार करणा-या देशांसोबत व्यापार करणं बंद करण्यासंबंधी अमेरिका विचार करत असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे.
उत्तर कोरियाने आपण लांबचा पल्ला गाठणा-या मिसालईलसाठी डिझाईन करण्यात आलेल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली असल्याचं सांगितलं आहे. तसंच आपली ही सहावी आणि सर्वात शक्तिशाली अणुचाचणी यशस्वी झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. दुसरीकडे, जगातील प्रमुख देशांनी यासंबंधी चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेने तर उत्तर कोरियाची आर्थिक नाकेबंदी करण्याचा विचार सुरु केला आहे.
काही दिवसांपुर्वी उत्तर कोरियाने आपल्या आक्रमक कारवाया सुरूच ठेवताना पुन्हा एकदा अणुचाचणी घेतली होती. उत्तर कोरियाने घेतलेल्या हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीतील स्फोटाची शक्ती ही त्यांच्या आधीच्या अणुचाचणीच्या तुलनेत दहापट अधिक होती. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार उत्तर कोरियाने परीक्षण केलेल्या हायड्रोजन बॉम्बची क्षमता आधी परीक्षण करण्यात आलेल्या अणुस्फोटांपेक्षा 9 पट अधिक होती. उत्तर कोरियाने याआधी अणुचाचण्या केलेल्या ठिकाणी जमीन हलल्याची माहिती भूकंपतज्ज्ञांना मिळाली होती. त्याबरोबरच चीन आणि अमेरिकेनेही हा एक स्फोट असल्याचे सांगितले होती.
हा बॉम्ब नव्याने विकसित करण्यात आलेल्या आंतरखंडीय क्षेपणास्रावरून वाहून नेता येईल अशा पद्धतीने तयार करण्यात आला आहे. तसेच तो आधीच्या अणुचाचण्यांपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. किम जोंग उन यांच्या आदेशानुसार घेण्यात आलेली हायड्रोजन बॉम्बची चाचणी पूर्णपणे यशस्वी आणि देशाच्या अणुकार्यक्रमाच्या दृष्टीने अर्थपूर्ण ठरली आहे, असे कोरियन वृत्तवाहिनीने सांगितले होते.
हायड्रोजन बॉम्ब म्हणजे काय? हायड़्रोजन बॉम्ब हा अणुबॉम्बपेक्षा अनेक पटीने संहारक असतो. अणुबॉम्बमध्ये स्फोट घडवण्यासाठी अणुविखंडनाची प्रक्रिया वापरली जाते. तर हायड्रोजन बॉम्बमध्ये केंद्रकीय संमिलन (फ्युजन) प्रक्रियेद्वारे स्फोट घडवून आणला जातो. संमिलनाची प्रक्रिया अणुविखंडनापेक्षा किचकट असते. ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता असते. त्यामुळे हायड्रोजन बॉम्बमध्ये संमिलन घडवण्यासाठी अणुस्फोट केला जातो. त्यामुळे हा स्फोट झाल्यानंतर हायड्रोजनची समस्थानिके असलेल्या ड्युटेरियम, ट्रिटीयम यांच्यात शृंखला अभिक्रिया होऊन मोठ्य़ा प्रमाणात ऊर्जा मुक्त होते. शितयुद्धाच्या काळात 1952 साली अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बचे परीक्षण केले होते. तर 1961 साली रशियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतली होती. अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले होते. मात्र भयंकर संहारक असलेल्या हायड्रोजन बॉम्बचा अद्याप युद्धात वापर करण्यात आलेला नाही.
याआधी उत्तर कोरियावर कडक निर्बंध लादण्याचा ठराव संयुक्त राष्ट्राने मंजूर केल्यानंतर उत्तर कोरियाने तीव्र शब्दांमध्ये प्रतिक्रिया व्यक्त केली होती. या ठरावाचा शिल्पकार असणाऱ्या अमेरिकेला याची हजार पटीने किंमत मोजावी लागेल अशी धमकीच उत्तर कोरियाने दिली होती.
संयुक्त राष्ट्राने उत्तर कोरियावर निर्बंध लादल्यास काय होईल ?1) उत्तर कोरियाकडून कोळसा, मासे, लोहखनिज आणि शिसं कोणालाही आयात करता येणार नाही2) उत्तर कोरियन कंपन्या किंवा व्यक्तींबरोबर जॉइंट व्हेंचर स्थापन करता येणार नाही3) सध्याच्या जॉइंट व्हेंचर्समध्ये कोणतीही नवी गुंतवणूक करण्यास बंदी