वॉशिंग्टन : चायना ईस्टर्न एअरलाईन्सच्या विमानाला २१ मार्च रोजी झालेल्या अपघातामागे घातपाताचा संशय असून, खुद्द वैमानिकानेच मुद्दाम हे विमान पाडल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. मात्र, चीनच्या नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणाने हे वृत्त फेटाळून लावले असून, तपास कामाची दिशाभूल करण्याचा हा कट असल्याचे म्हटले आहे.
चीनच्या कुनमिंग येथून गुआंगचौ येथे जाण्यासाठी झेपावलेले बोईंग ७३७-८०० हे विमान २१ मार्च रोजी गुआंग्शी या पर्वतराजीमध्ये कोसळले. या अपघातात १२३ प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅकबॉक्सची तपासणी सुरू आहे. आतापर्यंतच्या तपासणीमध्ये अपघातावेळी विमानात तांत्रिक दोष निर्माण झाल्याचे पुरावे निदर्शनास आलेले नाहीत.
एफडीआरचा हवाला
- तपासाशी संबंधित दोन अधिकाऱ्यांनी सकृतदर्शनी वैमानिकानेच विमान पाडल्याचे म्हटले आहे. विमानाच्या फ्लाईट डेटा रेकॉर्डरचा (एफडीआर) हवाला त्यासाठी दिला आहे.
- यासंदर्भात वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलने प्रकाशित केले असून, वैमानिकाने घातपात केला किंवा कसे, याबाबत कोणतेही वक्तव्य करण्यास बोईंग कंपनी आणि यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड यांनी नकार दर्शविला तर चीनच्या नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणाने वृत्त फेटाळले.