टोकियो : चीनच्या वुहान शहरातून जगभर पसरलेला कोरोना व्हायरस आता नव नवीन रुप धारण करून लागला आहे. यामुळे हा व्हायरस आधीपेक्षा खूप वेगाने पसरू लागला असून ब्रिटन, द. आफ्रिकेनंतर आता जपानमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन मिळाला आहे. संशोधकांनी हा नवीन स्ट्रेन ब्रिटनमध्ये सापडलेल्या स्ट्रेनपेक्षा जास्त संक्रमक असल्याचा इशारा दिला आहे. हा कोरोनाचा नवीन स्ट्रेन ब्राझीलहून परतलेल्या ४ लोकांमध्ये सापडला आहे.
निक्केई एशियाच्या बातमीनुसार कोरोनाची लागण झालेले प्रवासी दोन जानेवारीला ब्राझीलहून जपानच्या हनेदा विमानतळावर उतरले होते. यामध्ये महिला आणि पुरुष आहेत. या सर्वांची विमानतळावर चाचणी घेण्यात आली. तेव्हा ते पॉझिटिव्ह आढळले. कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन तीन लोकांमध्ये सापडला. त्यांना श्वास घेण्यास त्रास, ताप आणि घसेदुखी सारखी लक्षणे होती.
40 वर्षांच्या एका व्यक्तीमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. मात्र, त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. त्याला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला होता. या लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा शोध लागला आबे. जपानच्या आरोग्य मंत्रालयाने तातडीने डब्ल्यूएचओला कोरोनाच्या नवीन स्ट्रेनची माहिती दिली आहे.
जपानमध्ये सापडलेला नवीन स्ट्रेन हा अद्याप विकसित झालेला नाही, त्याची विकसित होण्याची प्रक्रिया सुरु आहे. यामुळे तो किती वेगाने पसरू शकतो याची माहिती मिळालेली नाही. जगभरात कोरोना लस दिली जात आहे, ती नवीन स्ट्रेनवर किती परिणामकारक आहे याचीदेखील माहिती मिळालेली नाही. जपानमध्ये दिवसाला 7000 हून अधिक रुग्ण सापडू लागले आहेत. आतापर्यंत तिथे 3900 लोकांचा मृत्यू झाला आहे.
जपानच्या पंतप्रधानांनी केले आवाहनजपानमध्ये वेगाने कोरोना व्हायरस पसरू लागल्याने त्याला रोखण्य़ासाठी आपत्कालीन स्थितीची घोषणा करण्यात आली आहे. ही स्थिती शुक्रवारपासून लागू झाली आहे. 7 फेब्रुवारीपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. मोठ्या प्रमाणावर लोकांची तपासणीही केली जाणार आहे. यासाठी पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावर लावण्यात आले आहे. पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी लोकांना सहकार्य़ाचे आवाहन केले आहे. रेस्टॉरंटच्या कामाच्या वेळेत कपात करणे आणि लोकांनी घरूनच काम करण्याचे आवाहन केले आहे. लोकही हे आवाहन पाळत आहेत.