इस्त्रायली सैन्याने गाझावर पुन्हा कब्जा करू नये आणि ते त्यांच्यासाठी योग्य ठरणार नाही, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं होतं की, युद्ध संपल्यानंतर त्यांचा देश "अनिश्चित काळासाठी" गाझामधील 'एकूण सुरक्षेची जबाबदारी' घेईल.
व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले, "इस्रायली सैन्याने गाझावर पुन्हा कब्जा करणं चांगलं नाही, असं राष्ट्राध्यक्षांचं अजूनही मत आहे. हे इस्रायली लोकांसाठी योग्य ठरणार नाही. मंत्री (एंटोनी) ब्लिंकन प्रदेशात जी चर्चा करत आहेत त्यापैकी एक म्हणजे संघर्षानंतर गाझाची स्थिती काय असेल? गाझामध्ये शासन कसं दिसेल? कारण काहीही झाले तरी ते 6 ऑक्टोबरला होतं तसं होऊ शकत नाही."
गाझा ताब्यात घेण्याबाबत दिला इशारा
अमेरिकेचा हा इशारा नेतन्याहू यांच्या सोमवारी झालेल्या विधानानंतर आला आहे, ज्यात त्यांनी गाझावर 'हमासच्या मार्गावर जाऊ इच्छित नसलेल्यांनी' राज्य केलं पाहिजे असं म्हटलं आहे. एबीसी न्यूजशी बोलताना ते म्हणाले, 'मला वाटतं की संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी इस्रायलकडे अनिश्चित काळासाठी असेल, कारण ती नसताना काय होतं ते आम्ही पाहिलं आहे.'
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनीही गेल्या महिन्यात गाझा ताब्यात घेणं ही इस्रायलसाठी 'मोठी चूक' असेल, असं म्हटलं होतं. महिनाभराच्या युद्धानंतर अमेरिका आणि इस्रायलमधील अंतर वाढत असतानाच या कमेंट्स आल्या आहेत. इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी मंगळवारी सांगितलं की युद्ध संपल्यानंतर, इस्रायल 'गाझा पट्टीतील कोणत्याही परिस्थितीला प्रत्युत्तर देण्यासाठी कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य राखून ठेवेल'.
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यानेही मंगळवारी स्पष्ट केलं की ते गाझा पट्टीवर दीर्घकालीन इस्रायली कब्जा करण्याच्या कल्पनेला समर्थन देत नाही. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वेदांत पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, आमचं मत असं आहे की पॅलेस्टिनींनी या निर्णयांमध्ये अग्रस्थानी असले पाहिजे आणि गाझा ही पॅलेस्टिनी भूमी आहे आणि ती पॅलेस्टिनी भूमीच राहील.