रशियाकडून तेल खरेदी कमी करा, अन्यथा...; अमेरिकेची भारताला धमकी; काय करणार पीएम मोदी?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 07:55 AM2022-04-06T07:55:18+5:302022-04-06T07:57:33+5:30
भारताला शहाजोगपणाचे सल्ले देणाऱ्या अमेरिकेची रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी
वॉशिंग्टन: रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू होऊन जवळपास दीड महिना होत आला आहे. दोन्ही देशांनी शांततेच्या मार्गानं प्रश्न सोडवावा, चर्चेतून तोडगा काढावा असा सल्ला भारतानं दिला होता. रशियावर निर्बंध लादण्याची, त्यांचा निषेध करण्याची भूमिका घेणं भारतानं टाळलं. मात्र युक्रेनची राजधानी कीव्ह शहराजवळील बुचामध्ये झालेल्या नरसंहारानंतर भारतावर दबाव वाढला आहे. भारतानं रशियासोबतचा व्यापार कमी करावा यासाठी अमेरिकेनं दबाव आणला आहे.
संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयोगातून रशियाला बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी मतदान होणार आहे. या मतदानात भारतानं अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांसोबत यावं आणि रशियाविरोधात मतदान करावं यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत. रशियावर आणखी कठोर निर्बंध लादण्यात यावेत अशी अमेरिकेची भूमिका आहे. कीव्हच्या बाहेर रशियन सैन्यानं नरसंहार घडवल्यानं जगभरात संतापाची लाट आहे.
अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी निर्बंध लादल्यानं रशियानं भारताला स्वस्तात तेल पुरवठा करण्याचा प्रस्ताव दिला. भारत रशियाकडून आपल्या एकूण गरजेच्या केवळ १ ते २ टक्केच खनिज तेल आयात करतो. मात्र भारतानं ती आयात आणखी कमी करावी यासाठी अमेरिकनं दबाव वाढवला आहे. रशियाकडून खनिज तेल आणि इतर वस्तूंची आयात वाढवणं भारताच्या हिताचं ठरणार नाही, असा धमकीवजा इशाराच व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जेन पास्की यांनी दिला आहे.
भारताला शहाजोगपणाचे सल्ले देणाऱ्या आणि रशियासोबतचे व्यापारी संबंध तोडण्यासाठी दबाव आणणाऱ्या अमेरिकेनं स्वत: मात्र रशियाकडून होणारी तेल खरेदी वाढवली आहे. अमेरिकेनं गेल्या आठवड्याभरात रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केलं आहे. अमेरिकेच्या खरेदीत ४३ टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती रशियन सुरक्षा परिषदेचे उपसचिव मिखाईल पोपोव यांनी दिली. अमेरिका रशियाकडून दररोज १०० हजार खनिज तेल अधिक खरेदी करत आहे. त्याचवेळी अमेरिका भारतासह इतर देशांना रशियाकडून तेल खरेदी करू नका यासाठी दबाव आणत आहे.