न्यूयॉर्क : जगभरात पाच वर्षांच्या आतील वयोगटातील तब्बल १८.१ कोटी लहान मुले कुपोषित असल्याचे ‘युनिसेफ’च्या ताज्या अहवालातून समोर आले आहे. याचाच अर्थ जगातील २७ टक्के म्हणजे प्रत्येक चौथे लहान मूल आवश्यक अन्नापासून आजही वंचित आहे. मुलांना योग्य प्रमाणात पोषक आहार न मिळण्यामागे गरिबी हे प्रमुख कारण आहे. दिला जात असलेला आहार परिपूर्ण नसल्याने श्रीमंत घरातील मुलेही कुपोषित ठरत असल्याचे दिसून आले आहे. १०० देशांमध्ये मुलांमधील कुपोषणाची स्थिती गंभीर आहे.
‘युनिसेफ’च्या अहवालानुसार कमी तसेच मध्यम उत्पन्न असलेल्या जवळपास १०० देशांमध्ये पाच वर्षांपेक्षा कमी वयोगटातील ४४ कोटी लहान मुले कुपोषित आहेत. = ६५% कुपोषित मुले भारतासह अन्य २० देशांत आहेत. - ३५% मुले अत्यंत गरीब म्हणून गणल्या जाणाऱ्या कुटुंबातील आहेत.- २३% कुपोषित मुले अत्यंत श्रीमंत म्हणून समजल्या जाणाऱ्या कुटुंबातील आहेत, असे म्हटले आहे.
पाच वर्षांपेक्षा लहान मुलांना योग्य आहार न मिळाल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. वयानुसार ही मुले मोठी तर होत जातात परंतु शारीरिक वाढ नीटपणे झालेली नसते. बहुतांश मुले सामान्यपणे आहारात दररोज तांदूळ आणि दूध घेत असतात; पण हा आहार पुरेसा नसतो. ही मुले कुपोषित राहण्याची शक्यता ५० टक्के इतकी असते. शरीराची पू्र्ण वाढ होण्यासाठी सर्व प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रोटिन्स मुलांना योग्य प्रमाणात मिळाली पाहिजेत.-कॅथरीन रसेल, युनिसेफ, कार्यकारी संचालक