इस्लामाबाद : मी आणि माझ्या कुटुंबीयांनी काहीही चुकीचे केले नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गुरुवारी सांगितले. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारविरुद्ध षड्यंत्र रचल्याबद्दल त्यांनी कोणाचेही नाव न घेता विरोधकांवर हल्ला केला. पनामा गेट घोटाळ्याच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या संयुक्त तपास पथकासमोर (जेआयटी) शरीफ आज हजर झाले. जेआयटी पनामा पेपरफुटीतून समोर आलेल्या शरीफ कुटुंबीयांच्या भ्रष्टाचाराचा तपास करीत आहे. पंतप्रधान असताना अशा तपास पथकासमोर हजर होणारे शरीफ हे पहिले पंतप्रधान आहेत. या आरोपांचा आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाशी संबंध नाही, तसेच ते भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. हे आरोप कुटुंबाच्या व्यवसायावरून मी आणि माझ्या कुटुंबावर करण्यात आलेले वैयक्तिक पातळीवरचे आरोप आहेत, असे शरीफ म्हणाले. तत्पूर्वी सहा सदस्यीय जेआयटीने शरीफ यांची जवळपास तीन तास चौकशी केली. माजी मुख्यमंत्री आणि आता तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरूढ झालो असताना मी अब्जावधी रुपयांचे प्रकल्प मंजूर केले. तथापि, माझे विरोधक माझ्यावर गैरप्रकारांचे आरोप करू शकत नाहीत. मी व माझ्या कुटुंबीयांचा चौकशीद्वारे नेहमीच असा छळ करण्यात येतो. मात्र, आजपर्यंत भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)चौकशीचा निष्कर्षही वेगळा नसेल- माझ्या विरोधकांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तथापि, यापूर्वी किंवा आताही यातील एकही आरोप सिद्ध झाला नाही. - काही घटक मी आणि लोकशाहीविरुद्ध कट रचत असून, त्यामुळे देशाची हानी होणार आहे. आमच्या राजकीय विरोधकांची सर्व कारस्थाने अयशस्वी होतील, असेही ते म्हणाले.- मी किंवा माझ्या कुटुंबीयांनी काहीही चुकीचे केले नसल्यामुळे सध्याच्या चौकशीचा निष्कर्षही वेगळा नसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काहीही चुकीचे केले नाही
By admin | Published: June 16, 2017 3:34 AM