वॉशिंग्टन : भारत आणि अनेक वरिष्ठ अमेरिकी संसद सदस्यांच्या तीव्र विरोधानंतरही अमेरिका सरकारने पाकिस्तानला आठ एफ-१६ लढाऊ विमानांची विक्री करण्याची केंद्रीय अधिसूचना जारी केली. राजपत्रात शुक्रवारी ही अधिसूचना प्रकाशित झाली. तीत म्हटले आहे की, ‘एफ-१६ लढाऊ विमानांची प्रस्तावित विक्री दक्षिण आशियातील एका व्यूहात्मक साथीदाराच्या सुरक्षेत सुधारणा घडवून आणण्यासह अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा उद्दिष्टांच्या पूर्ततेस हातभार लावते. या अत्याधुनिक विमानांची एकूण किंमत ७० कोटी डॉलर असल्याचे या अधिसूचनेत म्हटले असून, पाकिस्तान सरकारने ही विमाने देण्याची मागणी केली होती, असेही यात सांगण्यात आले आहे. भारताने पाकिस्तानला एफ-१६ विमाने देण्यास तीव्र विरोध केला होता. अशा शस्त्रांच्या हस्तांतरणामुळे दहशतवादविरोधी लढाईस मदत मिळेल हा अमेरिकेचा तर्कही भारताने फेटाळला होता.पाकला विमाने देण्याविरुद्ध मला पाठिंबा द्या, असे आवाहन रिपब्लिकन सिनेटर रँड पॉल यांनी सिनेटमधील आपल्या सहकाऱ्यांंना केले. अमेरिकी करदात्यांच्या अनुदानातून पाकला लष्करी सामग्रीची विक्री हा दहशतवादविरोधी लढाईत मदत करण्यासाठी राजी करण्याचा मार्ग होऊ शकत नाही, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
पाकला ‘एफ-१६’ विमाने देण्याची अधिसूचना जारी
By admin | Published: March 06, 2016 3:17 AM