अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील निर्णयाने संपूर्ण जगभरात हाहाकार माजला आहे. ग्लोबल मार्केटवर याचा मोठा परिणाम झाला आहे. आता ट्रम्प यांनी आणखी एक घोषणा करून, पुन्हा एकदा संपूर्ण जगाचेच टेन्शन वाढवले आहे. खरे तर, आधी टॅरिफ लावताना फार्मास्युटिकल्स औषधांना यातून सूट देण्यात आली होती. मात्र, आता ट्रम्प यांनी लवकरच यावरही टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. असे झाल्यास औषधांच्या किंमती मोठ्या प्रमणावर वाढू शकतात.
भारत अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर औषधांची निर्यात करतो. यामुळे ट्रम्प यांनी यावर टॅरिफ लादल्यास याचा मोठा परिणाम होऊ शकतो. यासंदर्भात नॅशनल रिपब्लिकन काँग्रेसनल कमिटीच्या (एनआरसीसी) एक कार्यक्रमात बोलताना, टॅरिफ लावल्यास औषध कंपन्या अमेरिकेत काम करण्याचा विचार करतील, असे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच, "आपण लवकरच फार्मास्यूटिकल्सवर एक मोठा टॅरिफ दावण्याची घोषणा करणार आहोत," असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
फार्मास्युटिकल एक्सपोर्ट प्रमोशन काउंसिल ऑफ इंडियाच्या मते, अमेरिका ही भारतीय औषधांसाठी एक प्रमुख निर्यात बाजारपेठ आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये, भारताने जगभरात २७.९ अब्ज डॉलर्सची औषध निर्यात केली होती, यांपैकी सुमारे ३१% म्हणजेच ८.७ अब्ज डॉलर्सची औषधे एकट्या अमेरिकेला निर्यात करण्यात आली होती.
माध्यमांतील वृत्तांनुसार, भारत जवळपास ४५% जेनरिक औषधे आणि 15% इतर औषधे अमेरिकेला सप्लाय करतो. डॉ. रेड्डी, अरबिंदो फार्मा, Zudus Lifesciences, सन फार्मा आणि ग्लँड फार्मा आपल्या एकूण उत्पन्नाच्या 30 ते 50 टक्के उत्पन्न एकट्या अमेरिकेकडून कमावतात.
अमेरिकेने औषधांवर टॅरिफ लावल्यास, याचा परिणाम वॉशिंग्टन आणि नवी दिल्ली दोघांवरही होईल. यामुळे उत्पादन खर्च वाढेल आणि ग्राहकांना अधिक किंमत मोजावी लागेल. याच बरोबर, एचडीएफसी सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांनीही, अमेरिकेने औषधांवर शुल्क लादल्यास त्याचा दोन्ही देशांवर नकारात्मक परिणाम होईल, असे म्हटले आहे.