कॅलिफोर्निया : कनेक्टिव्हिटीच्या या नंतरच्या विकासाच्या टप्प्यात दोन वस्तूंना जोडले जाईल व त्यांचे नियंत्रण वेबद्वारे केले जाईल, असे अमिन अरबाबियन यांनी सांगितले. अरबाबियन हे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे असिस्टंट प्रोफेसर असून त्यांनी नुकतीच मुंगीच्या आकाराची रेडिओ चिप विकसित केली आहे. या चिपचे प्रात्यक्षिक त्यांनी हवाई येथील व्हीएलएसआय टेक्नॉलॉजी अँड सर्किटस् सिंपोझियममध्ये दाखविले. स्टॅनफोर्ड इंजिनिअरिंगच्या टीमने मुंगीच्या आकाराची वायरलेस रेडिओ चिप तयार केली असून तिला बॅटरीची गरज नाही. या चिपला जी ऊर्जा लागते ती या चिपसाठी जे सिग्नल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरीद्वारे प्राप्त होतात त्या लहरीच ही ऊर्जा तिला देतात. अत्यंत कमी खर्च येणाऱ्या या अति छोट्या चिपचा उपयोग काय, असा प्रश्न विचारला गेला. त्यावर ही चिप कमांडस्ची मोजणी, अंमलबजावणी व त्यांचे प्रसारण करू शकते, असे स्टॅनफोर्डच्या निवेदनात म्हटले आहे. अरबाबियन यांनी २०११ मध्ये या चिपचा प्रकल्प हाती घेतला होता. तेव्हा ते पीएचडी करीत होते. त्यांच्यासोबत बर्कले येथील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील वायरलेस रिसर्च सेंटरचे संचालक अलि निकनेजादही होते. या टीममध्ये निकनेजाद यांची पत्नी मरयम तबेश व गुगलचे इंजिनिअर मुस्तफा रंगवाला यांचाही समावेश होता. (वृत्तसंस्था)
कनेक्टिव्हिटीसाठी आता मुंगीच्या आकाराची चिप
By admin | Published: September 11, 2014 11:23 PM