न्यूयॉर्क : भू-औष्णिक ऊर्जा म्हणजे पृथ्वीच्या पोटातील उष्णतेचा वापर करून वीज निर्माण करण्याची क्षमता. याने आतापर्यंत तुम्ही फक्त गरम पाण्याचे कुंड किंवा भात शिजविल्याचे ऐकले असेल, परंतु आता त्यामुळे घरांमध्ये वीज पुरवठाही होणार आहे. आतापर्यंत ३० देशांमधील जवळपास ४०० ऊर्जा प्रकल्प पृथ्वीच्या पोटात निर्माण झालेल्या वाफेचा वापर करून वीज निर्मिती करीत आहेत, त्यांची एकूण क्षमता १६ गिगावॉट आहे. संयुक्त राष्ट्राच्या रिन्युएबल ग्लोबल स्टेटस रिपोर्ट २०२३ मध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.
पाच किमी खोल जमिनीतून...भू-औष्णिक ऊर्जेसाठी २०० अंश सेल्सिअसपर्यंतचे पाणी ५,००० मीटर खोल बोअरहोलमधून उपसले जाते. त्याची उष्णता वीजनिर्मितीसाठी वापरली जाते, असे संशोधकांनी सांगितले.
६,००० अंश सेल्सिअस (११ हजार अंश फॅरेनाईट) हे पृथ्वीच्या गाभ्याचे किंवा केंद्राचे तापमान आहे. सूर्य जितका उष्ण आहे तितकेच पृथ्वीचे केंद्र उष्ण आहे. या तापमानातून उष्णतेवर आधारित ऊर्जा मिळण्याची शक्यता आहे. आपल्या पूर्वजांनाही भूऔष्णिक ऊर्जेच्या सामर्थ्याबाबत माहिती होती.
भू-औष्णिक ऊर्जेची किंमत किती?जर्मनीतील सहा संशोधन संस्थांनी केलेल्या विश्लेषणानुसार खोल भू-औष्णिक ऊर्जेसह उष्णता मिळविण्याची किंमत तीन युरो सेंट प्रति किलोवॅट इतकी कमी आहे. आता जगातील पहिले व्यावसायिक भूऔष्णिक संयंत्र जर्मनीच्या बाव्हेरियामधील गेरेस्ट्राइड शहरात बांधला जात आहे. ते धरणातील पाण्यावर अवलंबून नाही.
भारताची किती आहे क्षमता? भारतातील भूऔष्णिक संसाधनांचे मॅपिंग भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाद्वारे केले जाते. विस्तृत संशोधनांनुसार, भारतामध्ये एकूण भू-औष्णिक ऊर्जा क्षमता १० गिगावॉट असू शकते. सर्वात जास्त शक्यता लडाखमध्ये आहेत. भारत यासाठी सक्रियपणे काम करीत आहे.