बांगलादेशाचे पंतप्रधान पद सोडावे लागलेल्या शेख हसिना भारतात शरण घेत असताना त्यांच्या कट्टर विरोधक खालिदा झिया यांनी बांगलादेश सोडल्याने खळबळ उडाली आहे. कतारच्या शेखने विमान पाठवून त्यांना लंडनला नेले आहे. राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या अस्थिर झालेल्या बांगलादेशमध्ये यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
बांगलादेश आता कट्टरतावादाकडे झुकू लागला आहे. अशातच दोन्ही वरिष्ठ नेत्या देशाबाहेर गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हसिना यांची सत्ता येताच तीन वेळा पंतप्रधान राहिलेस्या खालिदा यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली तुरुंगात पाठविण्यात आले होते. हसिना यांची सत्ता उलथवून लावल्यानंतर आलेल्या काळजीवाहू सरकारने खालिदा यांची सुटका केली होती. त्यांना १७ वर्षांची शिक्षा झाली होती. खालिदा यांचा पक्ष पाकिस्तानचा समर्थक आहे. यूनुस सरकारनेही पाकिस्तानशी सलगी वाढविण्यास सुरुवात केली आहे. खालिदा यांच्यावरील गुन्ह्यांवर मंगळवारी सुनावणी होत होती. याचवेळी त्या लंडनला रवाना झाल्या.
बांगलादेशमध्ये डिसेंबर किंवा २०२६ च्या सुरुवातीला निवडणूक घेतली जाणार आहे. यामुळे दोन्ही प्रमुख नेत्या देशात नसल्याने त्यांच्या पक्षांवर याचा परिणाम होणार आहे. शेख हसिना यांचे परत जाणे कठीण आहे. परंतू, खालिदा या परत येऊ शकतात. खालिदा देशाबाहेर गेल्याचे वेगळे अर्थ लावू नयेत असे त्यांच्या पक्षाने म्हटले आहे. खालिदा या उपचारासाठी परदेशात गेल्या असल्याचेही ते म्हणाले आहेत.
खालिदा यांना नेण्यासाठी बांगलादेशच्या विमानतळावर कतारच्या अमीर शेख तमीम बिन हमद बिन खलीफा अल थानी यांनी खास एअर अँबुलन्स पाठविली होती. यात बसून त्या लंडनला गेल्या आहेत. खालिदा यांच्या डॉक्टरांनुसार त्यांना लीव्हर सिरोसिस, हृदयरोग आणि किडनीशी संबंधीत समस्या आहेत.