पाकिस्तानात सध्या भयंकर संकटाचा सामना करत आहे. त्याच्या एका बाजूला राजकीय, तर दुसऱ्या बाजूला प्रचंड मोठे असे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. या दोन्ही संकटात पाकिस्तान जखडला गेला आहे. यातच महागाईने पिचलेल्या पाकिस्तानसाठी आणखी एक वाईट बातमी आली आहे. "आज पाकिस्तान ज्या टप्प्यावर उभा आहे तेथून दिवाळखोरीचा मार्ग अगदी स्पष्टपणे दिसत", असे एका अमेरिकन शोध संस्थेने म्हटले आहे.
महत्वाचे म्हणजे, पाकिस्तानला एप्रिल 2023 ते जून 2026 दरम्यान 77.5 अब्ज डॉलर एवढे विदेशी कर्ज फेडायचे आहे. अशा परिस्थितीत रोखीच्या तुटवड्याचा सामना करणार्या पाकिस्तानसमोर दिवाळखोरीचा धोका अधिक आहे आणि यामुळे त्याला विघटनात्मक परिणामांना सामोरे जावे लागू शकते. अमेरिकेतील युनायटेड स्टेट्स इन्स्टिट्यूट ऑफ पीस (यूएसआयपी) या संस्थेने गुरुवारी प्रकाशित एका विश्लेषणात हा इशारा दिला आहे.
अहवालात मोठा खुलासा -जिओ न्यूजने गुरुवारी युनायटेड स्टेट्स इन्स्टिट्यूट ऑफ पीसच्या हवाल्याने म्हटले आहे की, गगनाला भिडणारी महागाई, राजकीय संघर्ष आणि वाढता दहशतवाद यांत सापडलेल्या पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर विदेशी कर्ज फेडायचे असल्याने दिवाळखोरीच्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानला पुढील तीन वर्षांत चिनी वित्तीय संस्था. खासगी कर्जदाते आणि सऊदी अरेबिया यांची मोठ्या प्रमाणावर परतफेड करायची आहे.