जेरुसलेम- इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यामध्ये सुरु असलेल्या लढाईने आता नवे रुप धारण केले आहे. गलोलीने दगड फेकणे, पेटत्या बाटल्या फेकणे असे प्रकार पॅलेस्टाइनकडून होत होते. मात्र आता पॅलेस्टाइनने पतंगाला आगीची गोळे बांधून इस्रायलच्या दिशेने सोडण्यास सुरुवात केली आहे. यामुळे इस्रायलमधील शेतांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.
पॅलेस्टाइनतर्फे शोधल्या गेलेल्या या नव्या अस्त्राला इस्रायलने काईट टेररिझम असे नाव दिले आहे. या काईट टेररिझमला आम्ही घाबरत नाही, यामुळे आमच्या शत्रूची स्थिती किती दयनीय असेल हे दिसतं असं विधान इस्रायलचे कॅबिनेटमंत्री हांगेबी यांनी केलं आहे. यामुळे माणसांना कोणताही धोका नाही त्यावर लवकरच उपाय शोधून काढू असंही ते म्हणाले. इस्रायलच्या नागरिकांनी या पतंगहल्ल्याला आजिबात घाबरु नये , त्यावर तोडगा काढण्यासाठी थोडा वेळ लागेल. विमान अपहरणस आत्मघातकी हल्ला, रॉकेट हल्ला, चाकूहल्ला या सगळ्यांवर आम्ही उपाय शोधून काढले आहेत तसाच यावरही उपाय शोधून काढण्याचं काम सुरु आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन त्यांनी केलं आहे.
मार्च महिन्यापासून या हल्ल्यांमुळे शेकडो एकर शेत जळून खाक झाले आहे. इस्रायल हा देश त्यांच्या शेतीतील प्रगतीसाठी ओळखला जातो. आजवर रहिवासी जागांवर हल्ला करणाऱ्या पॅलेस्टाइनच्या नागरिकांनी आता इस्रायलचे कृषी क्षेत्र लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत असे आगीचे गोळे जोडलेले 600 पतंग पॅलेस्टाइनने सोडले आहेत. त्यापैकी 400 पतंग हवेतच निकामी करण्यात इस्रायलच्या सुरक्षा दलांना यश आले आहे. मात्र 200 पतंगांनी इस्रायलमधील शेतजमिनीस आग लावली असून 2200 एकर शेत नष्ट झाले आहे.