ऑनलाइन लोकमत
क्वालालंपूर, दि. २५ - सिंगापूर आणि मलेशिया हे दोन देश लवकरच हायस्पीड रेल नेटवर्कने जोडले जाणार आहेत. या दोन देशांमध्ये सिंगापूर ते क्वालालंपूर दरम्यान बुलेट ट्रेनचा मार्ग उभारण्याचा करार झाला आहे. २०२६ पर्यंत हा प्रकल्प सुरु करण्याचा उद्देश आहे.
सध्या सिंगापूर ते कौलाल्मपूरमधील रेल्वे प्रवासाला पाच तासांचा वेळ लागतो. बुलेट ट्रेन सुरु झाल्यानंतर प्रवासाचा हा वेळ ९० मिनिटावर येईल. क्वालालंपूरमध्ये ब्रेकफास्ट करा, सिंगापूरमध्ये लंच करा आणि पुन्हा रात्रीच्या जेवणासाठी क्वालालंपूरमध्ये या असे मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी सांगितले. बुलेट ट्रेन सुरु झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये पर्यटनाला मोठया प्रमाणात चालना मिळेल. सिंगापूर-मलेशिया दरम्यान हवाई वाहतूकही मोठया प्रमाणावर चालते. बुलेट ट्रेनमुळे हवाई प्रवासावरील भारही काही प्रमाणात कमी होईल. या दोन शहरांमध्ये हवाई प्रवासाला ४५ मिनिटे लागतात.
बुलेट ट्रेनचा मलेशियाला सर्वाधिक फायदा
- बुलेट ट्रेनचा सिंगापूरपेक्षा मलेशियाला सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे. कारण मलेशियाच्या तुलनेत सिंगापूर महागडे शहर आहे. सिंगापूरमध्ये शॉपिंगसह निवासाचे दर जास्त आहेत. तेच मलेशियात शॉपिंग आणि निवास शुल्क परवडू शकते. त्यामुळे बुलेट ट्रेनची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर अनेकजण सिंगापूरऐवजी मलेशियाला जास्त पसंती देऊ शकतात.
- भारतातून सिंगापूरपेक्षा मलेशियाचा हवाई प्रवास जास्त स्वस्त आहे.
कधी झाली बुलेट ट्रेनची सुरुवात
बुलेट ट्रेनची सुरुवात सर्वात पहिल्यांदा जापानमध्ये झाली. १९६४ साली ५० वर्षांपूर्वी जापानमध्ये पहिल्यांदा हायस्पीड बुलेट ट्रेन धावली. सध्या जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन चीनमध्ये आहे. भारतही जापानच्या मदतीने आपल्या मुंबई-अहमदाबाद दरम्यान पहिल्या बुलेट ट्रेन मार्गाची उभारणी करत आहे.