लंडन : संपूर्ण ब्रह्मांड आपल्या मुठीत घेण्याची किंवा संपूर्ण विश्वाला गवसणी घालणारी कविकल्पना आता प्रत्यक्षात उतरू शकेल. त्यासाठी वैज्ञानिकांनी थ्री डी प्रिंटचा आधार घेतला आहे. वैज्ञानिकांनी सर्वात प्राचीन प्रकाशाचा एक नकाशा तयार केला असून त्याचे थ्री डी प्रिंट काढले जाऊ शकते. त्याआधारे आपल्याला हाती मावेल असे ब्रह्मांडाचे छोटेसे मॉडेल तयार करता येऊ शकेल.कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड (सीएमबी) हा एक प्रकाशपुंज असून तो अतिशय सूक्ष्म अशा तरंगांच्या पट्ट्यात येतो. त्यामुळे ब्रह्मांडातील सर्वात प्राचीन प्रकाश मोजला जाऊ शकतो. ब्रह्मांडाची निर्मिती होऊन ३.६ लाख वर्षे उलटली असताना सीएमबी या प्रकाशपुंजाची निर्मिती झाली आहे. १३.८ वर्षांचा इतिहास असलेल्या विश्वाचा हा प्रारंभीचा टप्पा होता. प्लान्क उपग्रहाने सीएमबीचे आजवरचे सर्वाधिक विस्तृत नकाशे तयार केले आहेत. ब्रह्मांडाची प्रारंभीची रचना तसेच तारामंडळाच्या रचनेवर ते प्रकाश टाकतात. मात्र विस्तारित नकाशे बघून त्याचे गूढ उकलणे ही अतिशय अवघड बाब आहे. लंडनच्या इम्पिरियल महाविद्यालयातील डेव्ह क्लीमेंटस्सह काही संशोधकांनी सीएमबीच्या थ्री डी प्रिटिंगची योजना आखली होती. त्यासंबंधी अभ्यास युरोपियन जर्नल आॅफ फिजिक्समध्ये प्रकाशित झाला आहे.(वृत्तसंस्था)>ब्रह्मांडाच्या प्रारंभीच्या रचनेशी संबंध...सीएमबीच्या तापमानात होणारे बदल हे वेगवेगळ्या घनतेशी संबंधित आहेत. आकाशगंगा, तारकापुंजाच्या रचनेशी त्याचा संबंध आहे. ब्रह्मांडाच्या प्रारंभीच्या अस्तित्वाशी त्याचा संबंध असू शकतो. सुपरिचित ‘सीएमबी कोल्ड स्पॉट’चे त्याबाबत उदाहरण देता येईल. हा ठिबका आकाराने छोटा असून तारकापुंजापासून वेगळा पडल्याचे जाणवते. वैज्ञानिकांनी थ्री डीच्या दोन फाईल्स तयार केल्या आहेत. त्यापैकी एक साधी तर दुसरी रंगीत रचना आहे. रंगछटांमधून तापमानातील फरक कळू शकतो, असेही वैज्ञानिकांनी नमूद केले आहे. >सीएमबीला थ्रीडीच्या स्वरूपात सादर करण्याची योजना आहे. ब्रह्मांडाचे लघु रूप केवळ बघताच येणार नाही तर हातात पकडता येईल. त्याचा अभ्यास आणि विस्ताराशी निगडित काही शक्यता समोर आणता येईल. दृष्टीबाधित लोकांसाठीही ही बाब विशेष महत्त्वाची ठरेल.- डेव्ह क्लीमेंटस्, शास्त्रज्ञ.
आता ‘थ्री डी’ प्रिंटच्या आधारे ‘ब्रह्मांड’ आपल्या हाती !
By admin | Published: November 01, 2016 2:53 AM