आपला शेजाकील देश असलेल्या नेपाळमध्ये अचानकच योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची चर्चा सुरू झाली आहे. येथे माजी राजे ज्ञानेंद्र शाह यांच्या पुनरागमनानंतर, हिंदूराष्ट्राची मागणी तीव्र होताना दिसत आहे. नेपाळची राजधानी काठमांडू येथे हिंदूराष्ट्राची मागणी करत हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. हे लोक, राजे ज्ञानेंद्र शाह यांच्यासोबतच योगी आदित्यनाथ यांचे फोटोही झळकावताना दिसले.
उत्तर प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या नेपाळचे राजकारण आता बदलताना दिसत आहे. येथे मोठ्या संख्येने लोक हिंदू राजेशाहीच्या समर्थनार्थ उभे राहत आहेत. चीन समर्थक माओवादी चळवळीने २००६ मध्ये राजा ज्ञानेंद्र यांची राजवट संपवली, असे मानले जाते. यानंतर नेपाळमध्ये डाव्या विचारसरणीचे राज्य सुरू झाले. पुष्पकमल दहल प्रचंड यांच्यानंतर केपी शर्मा सत्तेवर आले. मात्र आता पुन्हा एकदा, येथे राजेशाही परतण्याची चाहूल लागत आहे.
नेपाळला पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र बनवण्याच्या संकल्पाने ज्ञानेंद्र शाह गेल्या बऱ्याच दिवसांपासून नेपाळच्या वेगवेगळ्या भागांत मोहीम चालवत आहेत. ते रविवारी पोखरा येथून काठमांडूला पोहोचले. येथे त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळातून बाहेर येताच शाह यांच्या समर्थकांनी रॅली काढली. या रॅली दरम्यानर एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट घडली. रॅलीतील काही तरुण राजा ज्ञानेंद्र शाह यांच्या सोबतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे पोस्टर झळकावताना दिसून आले.
महत्वाचे म्हणजे, माजी राजे ज्ञानेंद्र शाह जानेवारी महिन्यात उत्तर प्रदेश दौऱ्यावर होते. माध्यमांतील वृत्तांनुसार, तेव्हा त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेतली होती. दरम्यान रविवारी, योगी आदित्यनाथ, माजी राजे ज्ञानेंद्र यांचे फोटो आणि राष्ट्रध्वज घेऊन तरुणांनी मोटारसायकलवरून रॅली काढली होती. मात्र आता, पंतप्रधान केपी ओली यांनी रॅली दरम्यान योगींचा फोटो वापरल्यावरून आक्षेप घेतला आहे.