रशियाने युरोपजवळ तैनात केल्या अण्वस्त्रवाहू पाणबुड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 11:18 AM2022-03-27T11:18:09+5:302022-03-27T11:18:40+5:30
अटलांटिक महासागरातील खेळी; पाश्चिमात्य देशांना प्रत्युत्तर
मॉस्को : रशियाने युरोपजवळ अटलांटिक महासागराच्या उत्तर भागात अण्वस्त्रवाहू पाणबुड्या तैनात केल्याने युक्रेन युद्धाला वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रत्येक पाणबुडीवर १६ आंतरखंडीय सज्ज ठेवण्यात आली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युरोप दौरा करून रशियावरील दडपण वाढविण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून रशियाने ही चाल खेळलीआहे.
रशियाने युरोपनजीक अण्वस्त्रवाहू पाणबुड्या तैनात करणे हा त्या देशाला दिलेला एक इशारा आहे. या पाणबुड्यांद्वारे हल्ला होण्याची शक्यता ब्रिटनच्या नौदलाने फेटाळून लावली आहे. युक्रेनच्या बाजूने अमेरिका व युरोपीय देश ठामपणे उभे राहिल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी आपल्या अण्वस्त्र दलांना सज्ज राहण्याचा आदेश दिला होता. त्यावर ही अनावश्यक कृती असल्याची टीका अमेरिकेने केली होती.
तणावात भर
युक्रेनमध्ये रशिया रासायनिक, जैविक अस्त्रांचा वापर करण्याची शक्यता असल्याचा दावा अमेरिकेने केला होता. रशियाने तशी कृती केल्यास त्याला नाटो देश जशास तसे उत्तर देतील, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिला.
पुतीन यांनी झापल्याने संरक्षणमंत्र्यांना हार्ट अटॅक
युक्रेनमध्ये सुरू केलेल्या लष्करी कारवाईत अपेक्षित यश मिळत नसल्याने नाराज झालेल्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या संरक्षणमंत्र्यांना चांगलेच झापले आहे. पुतीन यांनी झापले तेव्हा संरक्षणमंत्री सर्गेई शोईगू यांना हार्ट अटॅक आल्याची फेसबुक पोस्ट युक्रेनचे मंत्री अँटन गेराश्चेन्को यांनी केली आहे. या पोस्टमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.