इस्लामाबाद : काश्मीरवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होण्याची मला नक्की शक्यता वाटते. देव न करो, पण दोन्ही देश अण्वस्त्रसंपन्न असल्याने असे युद्ध परंपरिक युद्धापुरते मर्यादित न राहता त्यातून अणुयुद्धाचाही भडका उडू शकेल आणि त्याचे परिणाम भारतीय उपखंडाबाहेरही होतील, असे प्रक्षोभक विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे.‘अल जजिरा’ या अरबस्तानातील वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान म्हणाले की, ही अकल्पनीय शक्यता समोर दिसत असल्यानेच परिस्थिती या थरापर्यंत जाऊ नये यासाठी पाकिस्तान संयुक्त राष्ट्रसंघांसह प्रत्येत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर विनंती करत आहे. त्यांनी हस्तक्षेप करण्याची हिच वेळ आहे.इम्रान खान असेही म्हणाले की, मी शांततावादी व युद्धविरोधी आहे व युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही, असा माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे पाकिस्तान कधीही स्वत:हून युद्धाला सुरुवात करणार नाही. पण काश्मीरवरून निर्माण झालेली परिस्थिती अशीच राहिली तर भारताशी युद्ध होण्याची शक्यता आहे, असे मला नक्की वाटते.ते म्हणाले की, दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये जेव्हा प्राणांतिक युद्धास तोंड फुटते तेव्हा ते युद्ध पारंपरिक यद्धापुरते मर्यादित न राहता त्यातून अणुयुद्धाचा भडका उडण्याचीही शक्यता असते. ते पुढे असेही म्हणाले की, पाकिस्तानपुरते बोलायचे तर, देव न करो, पण पारंपरिक युद्धात आपला टिकाव लागत नाही, अशी वेळ आली तर अशा (अण्वस्त्रधारी) देशापुढे शरणागती पत्करणे किंवा स्वातंत्र्य जपण्यासाठी प्राणांतिक लढा देणे असे दोनच पर्याय शिल्लक राहतात. असे झाल्यास पाकिस्तानची जनता प्राणपणाने लढणे पसंत करेल, याची मला खात्री आहे.बेकायदेशीरपणे काश्मीर लाटणे आणि त्यावरून तेथे होऊ घातलेला नरसंहार याकडून जगाचे लक्ष हटविण्यासाठी भारत पाकिस्तानवर दहशतवाद पोसण्याचा आरोप करत आहे, असा दावा करत पाकिस्तानचे पंतप्रधान असेही म्हणाले: सहा आठवडे झाले भारताने ८० लाख काश्मिरी नागरिकांना जेरबंद करून ठेवले आहे. या त्यांच्या दुटप्पी खोटेपणातूनच संभाव्य भडक्याची ठिणगी पडू शकेल.इम्रान खान असेही म्हणाले की, काश्मीरची जनता जनमतातून आपले भवितव्य ठरवू शकेल, याची खात्री संयुक्त राष्ट्र संघाच्या ठरावात होती. पण त्याला हरताळ फासून आणि आपल्याच राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० गुंडाळून ठेवून भारताने काश्मीरवर बेकायदा कब्जा केला आहे. त्यामुळे सध्या तरी काश्मीरविषयी भारत सरकारशी चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही.त्यांनी असाही कांगावा केला की, हा प्रश्न चर्चेतून सुटावा यासाठी पाकिस्तान नेहमीच प्रयत्न करत आला आहे. पण ‘एफएटीएफ’च्या काऴ्या यादीत टाकून निर्बंध आणायचे आणि पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या कंगाल करायचे, असे भारत सरकारचे प्रयत्न असल्याचे दिसले तेव्हा आम्ही चर्चेतून माघार घेतली. (वृत्तसंस्था)>सीमेवरील मोर्चा स्थगितपाकव्याप्त काश्मीरमधून प्रत्यक्ष सीमारेषेपर्यंत लाखो लोकांचा एक ‘लॉँग मार्च’ काढून भारताला इशारा देण्याची योजना पाकमधील काही राजकीय व धार्मिक पक्षांनी आखली होती. परंतु २७ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत मी काश्मीरचा मुद्दा मांडणार आहे. तोपर्यंत थांबावे, असे आवाहन इम्रान खान यांनी शुक्रवारी पाकव्याप्त काश्मीरमधील सभेत केल्यानंतर हा मार्च तोपर्यंत स्थगित ठेवण्यात आला.
काश्मीरवरून अणुयुद्धही भडकू शकेल - इम्रान खान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 4:33 AM