मुंबई : भारतात भूतानमधूनशिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढायला हवी असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. मोदी सध्या भूतानच्या दौऱ्यावर असून तिथे रॉयल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले की, भारतीय विश्वविद्यापीठात भूतानचे सुमारे ४००० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हा आकडा वाढायला हवा. संपूर्ण जग भूतानला त्यांच्या ''सकल राष्ट्रीय आनंद'' (ग्रॉस नॅशनल हॅपिनेस) या संज्ञेकरिता ओळखते. या देशाने समजूतदारपणा, एकता आणि करुणेच्या भावनेला अतिशय चांगल्या पद्धतीने स्वीकारले आहे. इथे विकास आणि पर्यावरण एकमेकांना अडचणीत न आणता पुढे जात असल्याची नोंदही त्यांनी घेतली.
भारत- भूतान'च्या संबंधांचे केले कौतुक
भारत आणि भूतानमधील संस्कृतीचे नाते सांगतात पंतप्रधान मोदी म्हणाले की, ' भारत आणि भूतान या देशांचे फक्त भौगोलिक नव्हे ते इतिहास, संस्कृती, परंपरेच्या माध्यमातून नाते आहे. ही अशी धरती आहे जिथे राजा सिद्धार्थ गौतम यांचा जन्म झाला. इथून बौद्ध धर्माचा प्रकाश संपूर्ण जगभर पसरला. भिक्खू आणि अध्यात्मिक गुरूंनी या देशाला पुढे आणले. जगातले कोणतेही दोन देश भारत आणि भूतान एवढे एकमेकांना समजून घेऊ शकत नाहीत.
भारताच्या विकासाची दिली माहिती
भारतात होणाऱ्या विकासाचीही माहिती यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिली. ते म्हणाले की,' आज भारतात अनेक भागात प्रगती होत आहे. भारत अत्यंत वेगाने गरिबीचा कमी करत आहे. इथल्या सोयी सुविधा गेल्या पाच वर्षांत दुपटीच्या वेगाने वाढल्या आहेत. भारतात सध्या जगातली सर्वात मोठी आरोग्यविषयक योजना म्हणजे आयुष्मान भारत योजना सुरु आहे. इथे स्वस्त दरात इंटरनेट डेटा मिळतो. जगातले अनेक मोठे स्टार्ट अप भारतात असून, तिथून अनेक तरुण आपली स्वप्न पूर्ण करत आहेत.
यावेळी मोदी यांनी माहिती दिली की, थिम्पू ग्राउंड स्टेशन ऑफ द साऊथ एशिया या सॅटेलाईटचे उदघाटन त्यांनी भूतानच्या पंतप्रधानांसोबत केले. या सॅटेलाईटच्या माध्यमातून दूर भागातीलही प्राकृतिक, हवामान आणि इतर महत्वाच्या विषयांची माहिती मिळणार आहे. यावेळी त्यांनी भूतानच्या तरुण नागरिकांना भारतात येऊन त्यांच्या सॅटेलाईटवर काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले.