बीजिंग : चीनमध्येकोरोना संसर्गामुळे बळी गेलेल्यांची संख्या १,७७० वर पोहोचली आहे, तसेच ७०,५४८ पेक्षा जास्त लोकांना आतापर्यंत लागण झाली आहे. वुहान शहरातून कोरोनाची साथ जगभरात पसरली आहे. चीनशिवाय अन्य देशांत तीस ठिकाणी कोरोनाची साथ पसरली आहे. तैवान, फिलिपिन्स, हाँगकाँग, जपान, फ्रान्समध्ये प्रत्येकी एक रुग्ण मरण पावला आहे. चीनमध्ये मरण पावलेल्यांपैकी बहुतांश लोक हुबेई प्रांतातील आहेत.
पुढील देशांत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या याप्रमाणे आहे. सिंगापूर - ७५, हाँगकाँग - ५७, थायलंड -३४, दक्षिण कोरिया - ३०, मलेशिया - २२, तैवान - २०, व्हिएतनाम - १६, आॅस्ट्रेलिया - १५, मकाव - १०, भारत- ३, नेपाळ, श्रीलंका, कंबोडिया, फिनलंड, स्वीडन, बेल्जियम, इजिप्त प्रत्येकी एक रुग्ण, अमेरिका - १५, कॅनडा- ८, जर्मनी -१६, फ्रान्स -१२, ब्रिटन -९, इटली - ३, रशिया -२, स्पेन -२, संयुक्त अरब अमिरात - ९. कोरोना साथीने हाहाकार माजविल्यामुळे चीनच्या पार्लमेंटचे (नॅशनल पीपल्स काँग्रेस) वार्षिक अधिवेशन पुढे ढकलण्याचा विचार तेथील सरकारने चालविला आहे. हे अधिवेशन ५ मार्च रोजी बीजिंगमध्ये सुरू होणार होते. चीनच्या पीपल्स पोलिटिकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्स (सीपीपीसीसी) या सल्लागार मंडळासह पार्लमेंटचे होणारे अधिवेशन पुढे ढकलले तर तो चीनच्या राजकीय इतिहासातील आगळा निर्णय ठरणार आहे. क्रूझवर आढळले ९९ नवे रुग्णच्जपानमधील बंदरापासून दूरवर नांगरलेल्या डायमंड प्रिन्सेस या क्रूझवर असलेल्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेले ९९ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे या क्रूझवरील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ४५४ झाली आहे.च्जपानचे नवे राजा नारुहितो यांच्या वाढदिवसानिमित्त २३ फेब्रुवारी रोजी आयोजिलेला सार्वजनिक समारंभ कोरोनाची साथ आणखी पसरण्याची भीती असल्याने रद्द करण्यात आला. नारुहितो यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी नागरिकांना राजवाड्यात प्रवेश देण्यात येणार होता; पण तो कार्यक्रम रद्द करण्यात आला.१४ अमेरिकी नागरिकांना संसर्गच्डायमंड प्रिन्सेस क्रूझवर अडकलेल्यांपैकी सुमारे ३०० अमेरिकी नागरिकांना एका विशेष विमानाने अमेरिकेत आणण्यात आले. त्यातील १४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या रुग्णांना विमानातील स्वतंत्र कक्षात बसविण्यात आले होते.