वॉशिंग्टन : जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांमध्ये प्रथम क्रमांकावर असलेल्या अमेरिकेमध्ये या संसर्गाच्या बळींचा आकडा ५ लाखांवर पोहोचला आहे. पहिले, दुसरे महायुद्ध व व्हिएतनामबरोबर झालेला संघर्ष अशा तीन युद्धात अमेरिकेचे जितके सैनिक मारले गेले नव्हते तेवढी हानी कोरोनामुळे या देशात वर्षभरात झाली. जगभरात कोरोनाचे ११ कोटी १९ लाख रुग्ण असून, ब्राझिलमध्ये कोरोना बळींची संख्या अडीच लाखांच्या घरात पोहोचली आहे.
अमेरिकेमध्ये २ कोटी ८७ लाख कोरोना रुग्ण असून, त्यातील १ कोटी ८९ लाख जण बरे झाले. या देशात ९२ लाख ८१ हजार कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून, बळींचा आकडा ५ लाख ११ हजार झाला आहे. उपचाराधीन रुग्णांपैकी १६,९५३ जणांची प्रकृती गंभीर आहे.जगभरात कोरोनाचे ११ कोटी १९ लाख रुग्ण असून, त्यातील ८ कोटी ७३ लाख रुग्ण बरे झाले व २४ लाख ७८ हजार जणांचा बळी गेला आहे. तसेच दोन कोटी २१ लाख कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. (वृत्तसंस्था)
जगामध्ये पाच हजारांपर्यंतच कोरोना रुग्णांची संख्या असलेले ६३ देश आहेत. प्रशांत महासागराच्या दक्षिण भागात वनुअतू या अगदी छोट्या देशामध्ये जगातील सर्वांत कमी कोरोना रुग्णसंख्या म्हणजे अवघा एक रुग्ण आढळला आहे. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक या देशामध्ये ५००१ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.