वॉशिंग्टन : 4,922 जणांच्या मृत्यूसह इबोला रुग्णांच्या संख्येने दहा हजारांचा आकडा पार केला असल्याचे ‘हू’ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात म्हटले आहे.
सिएरा लिओन, लायबेरिया आणि गिनी या सर्वाधिक प्रभावित देशांना सोडून इतर देशांत इबोलाचे केवळ 27 रुग्ण आढळले आहेत. इबोलाचे बहुतांश बळी हे याच तीन देशांतील आहेत. मालीत अलीकडेच इबोलाचा एक बळी गेला आहे. या देशात एका दोन वर्षीय मुलीचा इबोलामुळे मृत्यू झाला. या मुलीच्या संपर्कात आलेल्या 4क् लोकांना इतरांपासून वेगळे करून संसर्गरोधी कक्षात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, अमेरिकेत इबोलाची लागण झालेली परिचारिका निना फाम ही बरी झाली असून, रुग्णालयातून सुटी मिळताच तिने व्हाईट हाऊसमध्ये जाऊन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतली. यावेळी ओबामा यांनी नीना हीला मिठी मारून तिच्या बरे होण्याबद्दल आनंद व्यक्त केला.
लसींच्या चाचण्या
जिनिव्हा : इबोला लसींच्या चाचण्या या रोगाने थैमान घातलेल्या पश्चिम आफ्रिकेत येत्या डिसेंबर महिन्यार्पयत सुरू करण्यात येणार असून या चाचण्यांची परिणामकारकता एप्रिलच्या आसपास समजून येईल. त्यानंतर इबोलाला आळा घालण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेतली जाऊ शकते, असे सार्वजनिक आरोग्य प्रशासनाने म्हटले आहे.(वृत्तसंस्था)