वॉशिंग्टन : अमेरिकी गुप्तचर संघटना सीआयएच्या ताज्या अंदाजानुसार इस्लामिक स्टेट अर्थात इसिसच्या दहशतवाद्यांची संख्या ३१ हजार ५०० पर्यंत असून हा आकडा यापूर्वीच्या अनुमानाहून तिप्पट आहे. इराक आणि सिरियाच्या मोठ्या भूभागावर कब्जा मिळविलेल्या या संघटनेचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काल व्यक्त केला होता. सीआयएच्या प्रवक्त्याने सांगितले की, इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड द लेव्हन्ट (इसिस) या संघटनेसाठी लढणाऱ्यांची इराक आणि सिरियातील संख्या २० हजार ते ३१ हजार ५०० असू शकते, असे सीआयएचे अनुमान आहे. मे ते आॅगस्टदरम्यानच्या सर्व गुप्तचर अहवालांच्या आढाव्या आधारे हा अंदाज बांधण्यात आला आहे. इसिसच्या दहशतवाद्यांची संख्या आमच्या यापूर्वीच्या अनुमानाहून कितीतरी अधिक आहे. यापूर्वी ही संख्या दहा हजार असेल, असा आमचा अंदाज होता, असे हा प्रवक्ता म्हणाला. लढाईत मिळविलेले यश, खिलाफतची घोषणा, अधिक सक्रियता आणि अतिरिक्त गुप्तचर कारवायांद्वारे पाया भरभक्कम केलेल्या या संघटनेने जूनपासून मोठ्या प्रमाणात भरती केली आहे. (वृत्तसंस्था)सीआयएच्या या अनुमानापूर्वी ओबामांनी इसिसविरुद्धच्या लढाईच्या मोठ्या विस्ताराची घोषणा केली. यात सिरियामध्ये हवाई हल्ले सुरू करण्यासह इराकसाठी अतिरिक्त ४७५ लष्करी सल्लागार नेमण्याचा समावेश आहे. इसिस ही अल-कायदापासून फुटून बनलेली नवीन दहशतवादी संघटना आहे. या संघटनेने इराकसह सिरियाच्या मोठ्या भूभागावर कब्जा मिळवला असून त्यामुळे या प्रदेशात धोका निर्माण झाला आहे. (वृत्तसंस्था)