ऑनलाइन लोकमत
हिरोशिमा, दि. 27 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आज हिरोशिमाच्या दौ-यावर आहेत. दौ-यादरम्यान बराक ओबामांनी हिरोशिमातल्या अणुबॉम्ब हल्ल्यातील मृत्युमुखी पडलेल्या 1,40,000 लोकांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी बराक ओबामा अण्वस्त्रांशिवायही जग परिपूर्ण आहे. मृत्यू आकाशातून आला आणि जग बदललं, असे म्हणालेत.
अमेरिकेने हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकल्यानंतर हिरोशिमाला भेट देणारे बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. बराक ओबामांनी हिरोशिमात 6 ऑगस्ट 1945मधल्या अणुबॉम्ब हल्ल्यातील मृतांच्या स्मरणार्थ बांधलेल्या पीस मेमोरिअल पार्क स्मारकालाही मान झुकवून अभिवादन केलं. मानवजातीला नष्ट करणं म्हणजे स्वतःला नष्ट करण्यासारखं आहे, असं प्रतिपादनही यावेळी बराक ओबामांनी केलं. मात्र त्यांनी हिरोशिमावर अमेरिकेनं टाकलेल्या अणुबॉम्ब हल्ल्याच्या घटनेसंदर्भात माफी मागण्याचं कटाक्षानं टाळलं आहे. यावेळी ओबामांनी मृतांच्या स्मृतींनाही उजाळा दिला आहे.
ओबामांनी जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबेंसोबत हिरोशिमात अणुबॉम्ब टाकलेल्या ठिकाणाला भेट दिली. अमेरिकेनं दुसरा बॉम्ब नागासाकी या शहरावर टाकला होता. नागासाकी शहरात तीन दिवसांत 70 हजारांहून अधिक लोकांचा त्यावेळी मृत्यू झाला होता. या अणुबॉम्ब हल्ल्याचं स्मृती जागवताना हा हल्ला किती भयंकर होता, याचंही महत्त्व बराक ओबामांनी पटवून दिलं आहे. ओबामांनी अणुबॉम्ब युद्धाविरोधात जनजागृती केल्यानं त्यांना पीस प्राइज देऊन सन्मानितही करण्यात आलंय.
हिरोशिमातल्या लोकांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा माफी मागतील, अशी आशा होती. मात्र हिरोशिमातल्या लोकांची आशा फोल ठरली आहे. या अणुबॉम्ब हल्ल्यातून 58 वर्षीय वाचलेली मुलगी हॅन जाँग सूनही यावेळी पार्कमध्ये उपस्थित होती. पिढ्यानपिढ्या आम्ही त्या हल्ल्याचा त्रास सहन करतो आहोत, ओबामांना अजून काय जाणून घ्यायचं आहे, असंही हॅन जाँग सूननं म्हटलं आहे.