वॉशिंग्टन : ग्रीसला आर्थिक संकटातून बाहेर काढून पूर्वपदावर आणू शकणाऱ्या पॅकेजसाठी संयुक्तरीत्या काम करण्यास अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांचे फ्रेंच समपदस्थ फ्रँकोईस होलांडे यांनी सहमती दर्शविली. ओबामांनी सोमवारी होलांडे यांना दूरध्वनी करून ग्रीसमधील सध्याच्या पेचप्रसंगावर चर्चा केली. तसेच गेल्या आठवड्यातच लियोन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले. युरोझोनमध्ये राहूनच ग्रीस पुन्हा वाढीच्या मार्गावर अग्रेसर होईल यासाठी त्याला वित्तपुरवठा आणि जोडीला सुधारणांचे पॅकेज याबाबतचा करार घडवून आणण्यासाठी पुन्हा काम करण्याची गरज असल्याचे दोन्ही नेत्यांनी मान्य केले, असे व्हाईट हाऊसने एका निवेदनाद्वारे सांगितले. आपले आर्थिक चमू ग्रीसमधील परिस्थिती, तसेच व्यापक आर्थिक बाजारांवर बारीक लक्ष ठेवून आहेत, असेही दोन्ही नेत्यांनी म्हटल्याचे या निवेदनात म्हटले आहे. ओबामा यांनी ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनाही दूरध्वनी केला. ट्युनिशियातील दहशतवादी हल्ल्यात ब्रिटिश नागरिक मृत्युमुखी पडल्याबद्दल त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या. उभय नेत्यांनी दहशतवाद आणि कट्टरवादाविरुद्ध संयुक्तरीत्या लढण्याच्या आपल्या निर्धाराचा पुनरुच्चार केला. त्यांनी ग्रीस व सुधारणेच्या मुद्यावरही चर्चा केली. ओबामांनी ट्युनिशियाच्या पंतप्रधानांनाही दूरध्वनी करून दहशतवादी हल्ल्याची निर्भत्सना केली.
ग्रीस संकटावर ओबामांची फ्रान्सच्या अध्यक्षांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2015 3:16 AM