- ऑनलाइन लोकमत
लाओस, दि. 8 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबमा यांनी बुधवारी फिलिपिन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो डुटर्टे यांची भेट घेतली. लाओसमध्ये नेत्यांच्या परिषदेदरम्यान डिनरच्या आधी दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाल्याचं अधिका-यांनी सांगितलं आहे. काही दिवसांपुर्वी रॉड्रिगो डुटर्टे यांनी बराक ओबामा यांना आईवरुन शिवी घातली होती. रॉड्रिगो डुटर्टे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर व्हाईट हाऊसने बराक ओबामांसोबत होणारी प्रस्तावित भेट रद्द केली होती. त्यानंतर रॉड्रिगो डुटर्टे यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली होती.
'होल्डिंग रुममध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली. किती वेळ त्यांच्यात चर्चा झाली हे सांगू शकत नाही मात्र सर्वात शेवटी बाहेर पडणा-यांमध्ये ओबामा आणि रॉड्रिगो डुटर्टे होते,' अशी माहिती रॉड्रिगो यांचे परराष्ट्र सचिव वायसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. व्हाईट हाऊसनेदेखील निवेदन जारी केलं असून ओबामा आणि रॉड्रिगो डुटर्टे यांच्यात संक्षिप्त चर्चा झाल्याचं सांगितलं आहे.
व्हाईट हाऊसने काही दिवसांपुर्वी बराक ओबामा प्रस्तावित भेटीम्ये फिलिपिन्समध्ये ड्रग्ज तस्करांना ज्याप्रकारे हाताळलं जात आहे त्यासंबंधी अध्यक्ष रॉड्रिगो डुटर्टे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं होतं. यामध्ये ड्रग तस्करांना देण्यात येणा-या मृत्यूदंडांवरही चर्चा केली जाणार होती. मात्र यामुळे संतापलेल्या रॉड्रिगो डुटर्टे यांनी बराक ओबामांवर आगपाखड करत खालच्या स्तरावर जाऊन शिवी घालत आपला संताप व्यक्त केला होता. यानंतर बराक ओबामा आणि रॉड्रिगो डुटर्टे यांची लाओस येथे आशियाई नेत्यांच्या बैठकीत भेट होणं अपेक्षित होतं. मात्र ही भेट रद्द करण्यात आली होती.
'ओबामांना काय वाटतं, कोण आहेत ते ? मी अमेरिकेच्या हातचं बाहुलं नाही. मी एका स्वतंत्र देशाचा अध्यक्ष असून मी फक्त फिलिपिन्स जनतेला उत्तर देण्यास बांधिल आहे', असं वक्तव्य रॉड्रिगो डुटर्टे यांनी केलं होतं.