वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २९-३० सप्टेंबर रोजी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतील. या भेटीदरम्यान उभय नेते अमेरिका-भारत व्यूहात्मक भागीदारी अधिक व्यापक करण्यासाठी परस्पर हितांच्या विविध मुद्यांवर चर्चा करतील. उभय नेत्यांची बैठक एक नव्हे, तर दोन दिवस चालणार आहे. यावरून अमेरिकेकडून द्विपक्षीय संबंधांना देण्यात येत असलेले महत्त्व लक्षात येते, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ओबामा आणि मोदी यांच्या पहिल्या भेटीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला तरी २९ आणि ३० सप्टेंबर रोजी त्यांची भेट होऊ शकते, असे हा अधिकारी म्हणाला. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जोश अर्नेस्ट यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा २९ व ३० सप्टेंबरला व्हाईट हाऊसमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यास उत्सुक आहेत. ओबामा दोन्ही देशांचे नागरिक आणि जगाच्या लाभासाठी भारत-अमेरिका व्यूहात्मक भागीदारीचे आश्वासन पूर्ण करण्याच्या उद्देशाने मोदींसोबत काम करण्यात उत्सुक आहेत.
ओबामा-मोदी बैठक दोन दिवसांची होणार
By admin | Published: September 10, 2014 2:08 AM