वॉशिंग्टन : भारतात मुस्लिम, तर बांगलादेश व पाकिस्तानात हिंदूंना असुरक्षित वाटते, असे वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यांचे मत असून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी देशात व परदेशात धार्मिक अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा निर्धार व्यक्त केला आहे. धार्मिक स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवारी बराक ओबामा बोलत होते. ते म्हणाले की, धार्मिक स्वातंत्र्य जोपासणे, तसेच धर्म आचरणाची मोकळीक असणे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक पिढीने या स्वातंत्र्याची जपणूक करायला हवी. गेल्या काही दिवसांत धार्मिक ठिकाणे, मुले व लोकांवर हल्ले झाले आहेत. ते आपल्या विचाराचे नाहीत, केवळ या कारणास्तव हल्ले होत आहेत, हे योग्य नाही. ओबामा यांनी आपल्या भाषणात कोणत्याही देशाचा उल्लेख केला नाही; पण धार्मिक स्वातंत्र्याला जगभरात प्राधान्य देण्यासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. अल्पसंख्याकांना लक्ष्य करून होणारे हल्ले रोखण्यासाठी संयुक्त आघाडीद्वारे आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे सांगून ते म्हणाले की, असुरक्षित वाटणाऱ्या अल्पसंख्यकांच्या आधारासाठी तेथील नेत्यांनी पुढे यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. (वृत्तसंस्था)
धार्मिक अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा ओबामांचा निर्धार
By admin | Published: January 17, 2016 2:01 AM