वॉशिंग्टन : प्रशांत महासागरातील कुरे अटोल समुद्रात ३00 फूट खोलीवर सापडलेल्या छोट्या लालसर तपकिरी आणि सोनेरी रंगाच्या नव्याने सापडलेल्या माशाला शास्त्रज्ञांनी बराक ओबामा यांचे नाव दिले आहे. तोसानोईडेस प्रजातीतील हा मासा आहे. तो ओबामा यांच्या नावाने ओळखला जाईल. पपाहनॉमोकुआकिया सागरी राष्ट्रीय स्मारकाचा विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ओबामा यांनी आपल्या कारकीर्दीत घेतला. त्यामुळे निसर्गाच्या संरक्षणास मोठी मदत झाली आहे. त्यामुळे ओबामा यांना हा बहुमान देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा मासा या स्मारकाच्या परिसरात आढळतो. हे स्मारक आता प्रशांत महासागरात १,५१0,000 वर्ग किमी परिसरात विस्तारले आहे. हा परिसर आता जगातील सर्वांत मोठा संरक्षित जमीन अथवा पाण्याचा भाग ठरला आहे. हा मासा जूनमध्ये सापडला होता. प्रशांत महासागरात असलेल्या अटोल रिफ्टच्या सर्वात उत्तरेकडील कुरे येथील शोध मोहिमेत हा मासा सापडला होता. हवाई येथील बिशप मुझियमचे सागरी जीवशास्त्रज्ञ रिचर्ड पायले यांनी या जातीच्या नर माशाचा शोध लावला. त्यानंतर काहीच दिवसात बिशप म्युझियमच्याच ब्रियान ग्रिने यांनी मादी माशाचा शोध लावला. या आधी अमेरिकेतील डक आणि बफेलो या नद्यांत सापडणाऱ्या माशाला ओबामा यांचे नाव देण्यात आले होते. एथिओस्टोमा ओबामा असे त्याचे नामकरण करण्यात आले होते.
ओबामा यांचे नाव माशाला
By admin | Published: January 16, 2017 5:09 AM